Vidhan Sabha 2019 : ‘ट्रेंडमध्ये फक्त आपणच पाहिजे’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पक्षाचे नेते उमेदवारी जाहीर करतील, तेव्हा करतील, पण काही झाले तरी सोशल मीडियाच्या ‘ट्रेंड’मध्ये फक्त आपणच असले पाहिजे, यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. 

विधानसभा 2019 
पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्यासाठी अल्प कालावधी शिल्लक असताना मतदारसंघात हवा तयार करण्यासाठी इच्छुकांना सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. यासाठी नेमलेल्या एजन्सीकडून अधिकृत फेसबुक पेज, फॅन क्‍लब पेजेस आणि व्हॉट्‌सॲपवरून मेसेजचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. पक्षाचे नेते उमेदवारी जाहीर करतील, तेव्हा करतील, पण काही झाले तरी सोशल मीडियाच्या ‘ट्रेंड’मध्ये फक्त आपणच असले पाहिजे, यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. 

निवडणूक म्हटली की, प्रचार सभा, पदयात्रा, कोपरा सभा, घरोघरी जाऊन गाठीभेटी घेणे हा सर्व प्रचार उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा आहे. विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी मतदारसंघातील नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी, काम दाखविण्यासाठी व इमेज बिल्डिंगसाठी सोशल मीडिया हे सर्वोकृष्ट साधन आहे.  सोशल मीडियाचे ‘ट्रॅफिक’ इच्छुकाच्या पेजवर आले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हॅशटॅगही आहेत. राजकीय पक्षांची आयटी सेल काय ट्रेंड चालवत आहे याचाही विचार करून इच्छुकांच्या पोस्ट फिरवल्या जातात. यासाठी उमेदवाराच्या अधिकृत पेजवरून विकासकामे, भेटीगाठी-कार्यक्रम आणि उपक्रमांच्या पोस्ट असतात. तर कार्यकर्त्यांच्या फॅन पेजवरून यमक जुळून ‘वारं सुटलंय ते आपलंच...’, ‘आमच ठरलंय २०१९...’, ‘आता वारं फिरलंय...’, ‘संघर्ष करणार.. परिवर्तन होणार...’ असे यमक जुळवून इच्छुकांचे फोटो वापरून तयार केलेल्या पोस्ट लोकप्रिय होत आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादीचे इच्छुक आघाडीवर आहेत.

एजन्सींची नेमणूक
पुण्यासह महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियासाठी एजन्सी नेमल्या आहेत. या एजन्सी दिवसभरातून अनेक पोस्ट फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्‌सॲपवरून फिरवत असतात. उच्चशिक्षित, तरुण, ज्येष्ठ नागरीक, श्रीमंत, मध्यमवर्गीय यासह इतर प्रकारचे मतदार आहेत. त्यांना भावेल अशा शब्दात व फोटोंचा वापर करून पोस्ट तयार केल्या जातात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trends of social media