‘भीमथडी जत्रे’त अनुभवा आदिवासी संस्कृती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

पुणे - आदिवासी महिला आणि पुरुषांचे समूह नृत्य...चर्मवाद्य आणि तंतुवाद्यांचा गजर...आदिवासी पाड्यांची आठवण करून देणारा भव्य मुख्य प्रवेशद्वार आणि विविध महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल्स. हे चित्र कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील मैदानावर भरविण्यात आलेल्या ११व्या भीमथडी जत्रेचे आहे. 

पुणे - आदिवासी महिला आणि पुरुषांचे समूह नृत्य...चर्मवाद्य आणि तंतुवाद्यांचा गजर...आदिवासी पाड्यांची आठवण करून देणारा भव्य मुख्य प्रवेशद्वार आणि विविध महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल्स. हे चित्र कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील मैदानावर भरविण्यात आलेल्या ११व्या भीमथडी जत्रेचे आहे. 

अकराव्या भीमथडी जत्रेचे उद्‌घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, भीमथडी जत्रेच्या अध्यक्षा सुनंदा पवार, विश्‍वस्त रजनी इंदुलकर, सई पवार, बारामती ॲग्रो लिमिटेडचे रोहित पवार, शंकरराव मगर, संभाजी नाना होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी बांधवांसह तब्बल ८ राज्यांतील कलाकारांच्या हस्तकलेच्या विविध वस्तू, सेंद्रिय खतांवर पिकविलेली धान्ये, फळे, मसाले, पापडे, गूळ, मध, नाचणी, लोणची, मुरांबे, रानभाज्या आणि फळभाज्यांची खरेदी या ठिकाणी करता येणार आहे. तसेच पुणेकर खवय्यांसाठी व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यसंस्कृती जपण्यासाठी सुप्रसिद्ध खान्देशी मांडे, उकडीचे मोदक, कोंबडी वडे, खेकडा थाळी, कोळंबी, सुरमई आणि पापलेटचा झुणका, बिर्याणीचे विविध प्रकार, लोणी, पराठे आणि हुरड्यांचे धपाटे, आपटी आमटी, चुलीवरील कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ असे प्रसिद्ध खाद्यपदार्थ चाखण्याची संधी ‘भीमथडी जत्रे’च्या निमित्ताने २ ते ५ मार्चदरम्यान पुणेकरांना मिळेल.   

भीमथडी जत्रेच्या अध्यक्षा सुनंदा पवार म्हणाल्या, ‘‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारी जत्रा मार्चमध्ये भरविण्यात येत आहे. भीमथडी जत्रेने यशस्वीरीत्या दहा वर्षे पूर्ण केली. या वेळी आदिवासी संस्कृती ही संकल्पनेवर आधारित रचना करण्यात आली आहे. तब्बल ३५० हून जास्त स्टॉल्स या ठिकाणी आहेत. या जत्रेमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील महिला, शेतकरी आणि लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. संगीत महोत्सवही आहे.’’ 

नृत्य, वाद्ये, पाड्यांच्या प्रतिकृतींचे दर्शन
अकराव्या भीमथडी जत्रेची या वर्षीची संकल्पना ही आदिवासी संस्कृती आहे. त्याची ओळख करून देण्यासाठी आदिवासी पाड्यांची प्रतिकृती भव्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आली आहे. तसेच पुणेकरांसाठी आदिवासी नृत्ये, वाद्यांची झलकही या ठिकाणी पाहता येईल; तसेच आदिवासी हस्तकला वस्तू, रानभाज्या, विविध आजारांवरील औषधी वनस्पतींचे स्टॉल्सही या ठिकाणी आहेत. 

Web Title: tribal culture in bhimthadi jatra