आदिवासी संस्कृतीचे रम्य दर्शन (व्हिडिओ)

आदिवासी संस्कृतीचे रम्य दर्शन (व्हिडिओ)

पुणे - तपकिरी रंगाचा ससा आणि रुबाबदार कोंबडा दिसला. दगडांमधून धो-धो वाहणारं पाणी दिसलं. ते जंगल नव्हतं; पण जंगलात राहणाऱ्या आदिवासींची वस्ती असल्याचा भास तिथं निर्माण केलेला होता. हे गमतीदार दृश्‍य आहे क्‍वीन्स गार्डन परिसरातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संग्रहालयातील. 

झाडाच्या जाडजूड मुळीला रंगरूप देऊन तिच्यापासून अजगर तयार केलेला पाहून मजाच वाटली. काचेच्या बाटलीत ताक घुसळण्याची रवी पाहताना प्रश्‍न पडला, की हे कसं तयार केलं असेल? मोठ्ठ्या आकाराचे ढोल होते. धनुष्यबाण आणि चित्रविचित्र वाटणारे मुखवटेही होते. या संग्रहालयात आदिवासींचं घर, शेती व शिकारीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू आहेत. त्याचबरोबर हस्तकलेचे उत्तमोत्तम नमुने बघायला मिळतात. लाकूड, माती, धातू व कागदाचा लगदा वापरून बनवलेल्या विविध कलाकृती पाहून डोळे दिपतात. 

राज्यात आढळणाऱ्या साधारण अठरा आदिवासी जमातींची जीवनपद्धती या संग्रहालयात वस्तू, चित्रं, छायाचित्रं व पुतळ्यांच्या माध्यमातून समजून घ्यायला मदत मिळते. कोकण, मराठवाडा, गोंडवन व सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये, रानावनांमध्ये राहिलेल्या आदिवासींचा इतिहास इथं जपलेला आहे. आदिवासी नागरिक निसर्गाचा घटक म्हणूनच जगतात, ते निसर्गाला ओरबाडत नाहीत. त्याची पूजा करतात. सेवाभावनेनं त्याची जोपासना करतात. त्यांच्या गरजा किती थोड्या आहेत, हे इथं त्यांच्या जीवनदर्शनातून कळतं. 

आदिवासींच्या दागिन्यांची कलाकुसर, वारली चित्रकलेतील सौंदर्य, शरीरावरील गोंदणातील प्रतीकं,  अत्यल्प साधनांमधून उभारलेल्या झोपड्या हे सारं आपल्याला बरंच काही शिकवून जातं. आदिवासी नागरिकांमधलं सामाजिक ऐक्‍य दर्शवणारी त्यांची सामूहिक नृत्यकला चित्रांमधून उलगडते. बासरीचा मंजूळ स्वर वाजवत एखादा आदिवासी मुलगा रानात फिरत असेल तेव्हा झाडंवेलीही मोहून जात असतील असं इथलं जग पाहताना वाटतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com