आदिवासी महिलांसाठी दहा हजार सॅनिटरी नॅपकिन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

पुणे  - मुळशी तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रेरणा- एक मदत आरोग्यासाठी’ या उपक्रमांतर्गत सुमारे दहा हजार ‘सॅनिटरी नॅपकिन’ जमा झाले आहेत. यासाठी बालाजीनगरच्या गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनने पुढाकार घेऊन उद्दिष्ट पूर्ण केले. लवकरच त्यांचे वाटप केले जाणार आहे.

पुणे  - मुळशी तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रेरणा- एक मदत आरोग्यासाठी’ या उपक्रमांतर्गत सुमारे दहा हजार ‘सॅनिटरी नॅपकिन’ जमा झाले आहेत. यासाठी बालाजीनगरच्या गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनने पुढाकार घेऊन उद्दिष्ट पूर्ण केले. लवकरच त्यांचे वाटप केले जाणार आहे.

मुळशी तालुक्‍यातील आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच या समाजातील महिला ‘सॅनिटरी नॅपकिन’चा वापर करत नाहीत. त्यातून त्यांच्या आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे बालाजीनगर येथील ‘गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन’च्या माध्यमातून गेल्या वर्षी ‘प्रेरणा- एक मदत आरोग्यासाठी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यातून पुणेकरांना ‘सॅनिटरी नॅपकिन’ची मदत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. 

यंदा या उपक्रमासाठी गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन व ब्लूमिंग बड्‌स नर्सरी स्कूलतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पद्मावतीच्या अण्णा भाऊ साठे सभागृहात कार्यक्रम झाला. जवान जगदीश काकडे यांच्या पत्नी राधिका यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. या वेळी पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विविध क्षेत्रांत कार्य केलेल्या स्त्रियांचा ‘स्त्रीशक्ती सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. 

या वेळी स्कूलच्या संचालिका शारदा विनोद दातीर यांनी ‘प्रेरणा’ उपक्रमांतर्गत एक सॅनिटरी नॅपकिन मदत करण्याचे आवाहन केले. त्याला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. ‘वूमन हाईक’ या संस्थेच्या सुजाता मेंगाणे व मिसेस इंडिया अर्थ सोनिया पाटील यांनी प्रत्येकी अडीच हजार सॅनिटरी नॅपकिन दिले. यातून सुमारे सहा हजार नॅपकिन जमा झाले. एप्रिलपर्यंत दहा हजार नॅपकिन जमा करण्यात येणार आहेत. 

या वेळी ‘नवराई माझी लाडाची’ या ‘ब्रायडल थीम’वर आधारित ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. 

यात सोनू जोशी या विजेत्या झाल्या. तसेच मुळशी तालुक्‍यातील माले येथील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी नृत्य आणि नाटिका सादर केली.

Web Title: Tribal Women Sanitary Napkin