टपाल तिकिटांद्वारे गांधीजींना आदरांजली

राजन वडके  
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

सुमारे ५० देशांच्या साडेचारशे तिकिटांचा संग्रह टपाल तिकीट संग्राहक आणि अभ्यासक (फिलॅटेलिस्ट) मदन विठ्ठल लांजेकर यांनी जपला आहे. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने प्रकाशित केलेले त्यांचे विचार सांगणारी पहिली वर्तुळाकार सात तिकिटेही त्यांच्या संग्रहात आहेत. 

पुणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतासह जगभरातील १८० ते २०० देशांनी त्यांच्या जीवनप्रसंगांवर टपाल तिकिटे प्रकाशित केली आहेत. यातील सुमारे ५० देशांच्या साडेचारशे तिकिटांचा संग्रह टपाल तिकीट संग्राहक आणि अभ्यासक (फिलॅटेलिस्ट) मदन विठ्ठल लांजेकर यांनी जपला आहे. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने प्रकाशित केलेले त्यांचे विचार सांगणारी पहिली वर्तुळाकार सात तिकिटेही त्यांच्या संग्रहात आहेत. 

मूळचे कोल्हापूरचे असलेल्या लांजेकर यांना अकराव्या वर्षी टपाल तिकिटे जमविण्याचा छंद लागला. आवड वाढत गेली तसे त्यांनी संग्रह वाढविण्यासाठी तिकीट संग्राहकांच्या प्रदर्शनांना भेट देण्यास सुरवात केली. त्या प्रदर्शनांतून आणि संग्राहकांकडून त्यांना या छंदाबाबत बरीच माहिती मिळाली. संग्रहातील तिकिटांची अधिकृत माहिती व नव्याने प्रकाशित होणारी तिकिटे मिळविण्यासाठी त्यांनी १९८० मध्ये टपाल खात्यात फिलॅटेलिक डिपॉझिट अकाउंट (पीडीए) उघडले. ‘पीडीए’चे सदस्यत्व मिळाल्याने त्यांना नवनवीन तिकिटे घरबसल्या मिळू लागली. साहजिकच उत्साह वाढून तिकीट संग्रहसुद्धा वाढत गेला. 

यात विविध देशांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि त्यांच्या कार्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी प्रकाशित केलेल्या त्यांच्या जीवनप्रसंगांवरील तिकिटे हे त्यांच्या संग्रहाचे आगळे वैशिष्ट्य आहे. महात्मा गांधी यांच्या मृत्यूनंतर १९४८ पासून भारतीय टपाल खात्याने  प्रकाशित केलेल्या असंख्य तिकिटांबरोबरच अमेरिका, नेपाळ, रशिया, इंग्लंड, इराण, मॉरिशस आदी ४५ देशांनी महात्मा गांधी यांची प्रकाशित केलेली ४५० तिकिटे त्यांच्या संग्रही असल्याचे ते अभिमाने सांगतात. दक्षिण आफ्रिकेसारख्या काही देशांनी काही विशेष तिकिटे संयुक्तरीत्या प्रकाशित केलेली तिकिटेही आहेत.

लांजेकर यांच्याकडे देश-विदेशातील मिळून सुमारे ८० हजार टपाल तिकिटांचा संग्रह आहे. त्यातील भारतीय तिकिटांमध्ये भारताची तांत्रिक, वैज्ञानिक, शैक्षणिक व कृषीविषयक प्रगती दर्शविणारी तिकिटे, राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, विचारवंत, साहित्यिक, संगीतकार, गायक आदींच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रकाशित केलेल्या तिकिटांचाही समावेश आहे. 

सांस्कृतिक राजदूत
टपाल तिकिटे ही त्या त्या देशांचे सांस्कृतिक दूत म्हणून भूमिका बजावत असतात. त्यामुळे भारतीय परंपरा, कला, साहित्य, संस्कृती तसेच समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुषांनी केलेल्या कार्याची माहिती जगभरात पोचते. अशा टपाल तिकिटांद्वारे या सर्वांच्या स्मृतीबरोबरच आदरही जपला जातो, अशी भावना मदन लांजेकर यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tribute to Gandhi postage stamps