वाढीव बांधकामांमुळे वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पिंपरी -  पिंपरी कॅम्प येथील मुख्य बाजार पेठेसह शगुन चौक, साई चौक, कराची चौक, काळेवाडी रस्ता, रिव्हर रोड भागात दुकानदारांनी केलेली वाढीव बांधकामे, हातगाड्या, अनधिकृत पार्किंग, बेशिस्त वाहनचालक यांच्याकडे महापालिका व पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. 

पिंपरी -  पिंपरी कॅम्प येथील मुख्य बाजार पेठेसह शगुन चौक, साई चौक, कराची चौक, काळेवाडी रस्ता, रिव्हर रोड भागात दुकानदारांनी केलेली वाढीव बांधकामे, हातगाड्या, अनधिकृत पार्किंग, बेशिस्त वाहनचालक यांच्याकडे महापालिका व पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. 

शहरासह लगतच्या उपनगरातील नागरिक येथे खरेदीसाठी येतात. विशेषतः सायंकाळी बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. बाजारपेठेतील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. सिग्नल न पाळणे, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे अशा प्रकारांमुळे चौकातील वाहतुकीचा खोळंबा होतो. येथे येणाऱ्यांसाठी आवश्‍यक पर्यायी वाहनस्थळाची पुरेशी सुविधा नसल्याने रस्त्यावरच दुतर्फा वाहने लावली जातात. त्यात इंदिरा गांधी उड्डाण पुलावरील (पिंपरी पूल) दोन रिक्षा थांबे भर टाकीत आहेत. 

या पुलावरून पिंपरी चौक व अहल्यादेवी चौक आणि शगुन चौकाच्या दिशेने जाण्यासाठी एकेरी मार्ग आहे. या पुलावर पोलिस नसल्याने तिन्ही चौकांच्या दिशेने दुपारी व रात्री दुहेरी वाहतूक जोरात सुरू असते. त्यामुळे पुलावर येणाऱ्या वाहनांवर समोरून येणारी वाहने आदळून सतत अपघात होतात. पूल उतरल्यानंतर बाजारपेठेतील शगुन चौक, साई चौक, पिंपरीगाव, काळेवाडी आदी मार्गावर अनेकदा पोलिस नसल्याने बाजारपेठेतील वाहतुकीला शिस्त राहत नाही. 

पुलावरून लिंकरोडला जाण्यासाठी वाहतूक नियंत्रक दिवा आहे; मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे दिवसभर या परिसरात वाहतुकीचा बोऱ्या वाजतो. तसेच छोट्या विक्रेत्यांचे अतिक्रमण, टेंपो, हातगाड्या व दुचाकी वाहने रस्त्यावरच लावली जातात, तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे शगुन चौक व साई चौकात वाहतूक समस्या उग्र झाली आहे. त्यामुळे पादचारी, वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र त्याकडे महापालिकेच्या संबंधित विभाग व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे. 

पिंपरीतील अतिक्रमणांवर या आधी सतत कारवाई केली आहे. मात्र अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा ती होतात. परंतु आगामी काळात बाजारपेठेतील अनधिकृत वाढीव बांधकामे, अतिक्रमणे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. कारण येथील वाहतूक कोंडी अतिक्रमणांमुळेच होत आहे. 
- तानाजी शिंदे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.

लवकरच महापालिका अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन संयुक्तपणे कारवाई करून येथील वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. 
- राजेंद्र भांबरे, सहाय्यक आयुक्त,  परिमंडळ तीन, वाहतूक विभाग. 

Web Title: Ttraffic jams in pimpri camp