क्षयाची माहिती न देण्याचा ‘संसर्ग’

ब्रिजमोहन पाटील
गुरुवार, 25 जुलै 2019

खासगी रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा, औषधांची दुकाने येथून महापालिकेला क्षयरुग्णांची माहिती मिळत नाही. ही माहिती मिळावी, यासाठी बैठका घेतल्या जात असून, यात आणखी वाढ करण्यात येईल. 
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका

शहरातील ६,६७१ पैकी फक्त ४५ आस्थापनांकडून पालिकेला माहिती
पुणे - क्षयरुग्णांची माहिती महापालिकेला देणे हे रुग्णालये, दवाखाने, औषधांची दुकाने आणि प्रयोगशाळांना बंधनकारक आहे. परंतु, पुण्यातील रुग्णालयांना व इतर आस्थापनांना क्षयरुग्णांची माहिती न देण्याचाच संसर्ग झाला आहे.

शहरातील ६ हजार ६७१ पैकी केवळ ४५ आस्थापनांकडून महापालिकेला अहवाल पाठविले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

क्षय हा संसर्गजन्य रोग असल्याने रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यालाही याची लागण होते. याकडे दुर्लक्ष होत असल्याने पुण्यातील क्षयरुग्णांची संख्या दरवर्षी वाढत आहे. वेळेवर उपचार होत नसल्याने ‘एमडीआर’, ‘एक्‍सडीआर’ या श्रेणीत रुग्ण जाऊन आजार बळवतो. महापालिकेच्या दवाखान्यांपेक्षा जास्त रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये जातात.

परंतु, त्यांची माहिती आरोग्य विभागाला कळविली जात नाही. यामुळे शहरात नेमकी क्षयरुग्णांची संख्या किती, याची माहिती मिळत नाही.
शहरातील रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा आणि औषधांची दुकाने यांनी क्षयरुग्णांची माहिती देणे बंधनकारक आहे. यातील एकाही आस्थापनेने रुग्णाची माहिती दिली, तर त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. शहरात यंदा मार्चअखेरपर्यंत १ हजार ६४४ रुग्णांची माहिती महापालिकेकडे आली आहे.

त्यापैकी ८६९ रुग्ण महापालिका, तर ७७५ रुग्ण खासगी दवाखान्यातील आहेत. खासगी रुग्णालयातील ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रुग्णांची माहिती महापालिकेकडे येत नाही. त्यामुळे हा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

कारवाई होऊ शकते
क्षयरुग्णांची माहिती महापालिकेला न दिल्यास संबंधित आस्थापनांवर भारतीय दंड विधानातील कलम २६९ व २७० नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यात सहा महिने ते दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tuberculosis Information Healthcare Sickness Municipal