देहूनगरी तुकोबामय.... 

देहूनगरी तुकोबामय.... 

देहू - टाळ मृदंगाचा गजर...ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड जयघोष...रणरणत्या उन्हातही भाविकांनी दाखविलेली तुकोबारायांवरील अतूट श्रद्धा...भाविकांची अलोट गर्दी...अशा भक्तिरसात अवघी देहूनगरी न्हाऊन निघाली. वैकुंठगमनाच्या निमित्ताने भरणाऱ्या बीज वारीला आलेल्या लाखो भाविकांनी वारकरी संप्रदायाचे कळस असलेल्या तुकोबारायांच्या चरणी अर्पण केली. भाविकांच्या गर्दीने आणि "तुकाराम-तुकाराम'च्या अखंड घोषाने "इंद्रायणी'च्या काठी जणू भक्तीचा महापूर आला होता. "तुका आकाशा एवढा' या अभंगाची अनुभूती उपस्थित भाविकांनी घेतली. 

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत आयोजित सप्ताहामध्ये राज्याच्या निरनिराळ्या भागांतून आलेल्या भाविकांचा अखंड हरिनामाचा गजर सुरू होता. पायी वाटचाल करीत हजारो भाविक सोमवारी रात्री देहूत दाखल झाले. काही थेट वाहनाने आले. बिजेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांना अधिकाधिक सोईसुविधा देण्यात आल्या होत्या. 

सोमवारीच मुख्य देऊळवाडा, तसेच वैकुंठगमन स्थान मंदिरातील दर्शनबारी भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होती. हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, जागरामुळे अवघी देहूनगरी रात्रभर जागी होती. मंगळवारी भल्या पहाटे पवित्र इंद्रायणी नदीवर स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती. घाट प्रशस्त करण्यात आल्यामुळे "इंद्रायणी'वर दरवर्षी उडणारी भाविकांची झुंबड यंदा दिसून आली नाही. स्नानानंतर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होत होती. 

ठिकठिकाणच्या दिंड्या घाटावर येत होत्या. त्यातील वारकरी हरिनामाचा आनंद घेत फुगड्या, पावक्‍या खेळत होते. परिसरातील सप्ताहामध्ये सकाळपासून नैमित्तिक कार्यक्रम सुरू होते. मात्र, प्रत्येकाला आस लागली होती ती वैकुंठगमन सोहळ्याची. सकाळी दहाच्या सुमारास तुकोबारायांची पालखी वैकुंठगमन सोहळ्यासाठी जाणार असल्याने पालखीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. देवस्थानचे पदाधिकारी, मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी महाद्वारातून बाहेर येताच दर्शनासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली. 

दरम्यान, बिजेच्या सोहळ्यानिमित्त वैकुंठगमन स्थान मंदिराप्रमाणे गोपाळपुरा, तळेगाव रस्ता, आळंदी रस्ता, देहूरोड रस्त्याच्या परिसरात असलेल्या सप्ताहामध्येही सकाळी दहा ते बारा या वेळेत वैकुंठगमन सोहळ्याचे कीर्तन सुरू होते. त्यात कीर्तनकार सांगत असलेल्या प्रसंगाने अवघे वैष्णव भावुक झाले होते. मात्र, तुकोबारायांनी दिलेल्या अमूल्य अभंगवाणीचे पारायण केलेल्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसून येत होता. 

वैकुंठगमन सोहळ्याची वेळ जवळ येताच भाविकांची उत्सुकता शिगेला पोचली. प्रत्येकाच्या नजरा वैकुंठगमन स्थान मंदिराकडे लागल्या. इंद्रायणीचे दोन्ही काठ, दोन्ही पूल, परिसरातील इमारतींवर भाविक हा सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी सकाळपासूनच जागा पकडून बसले होते. बाराच्या सुमारास सारे देहू नांदूरकीच्या झाडाजवळ एकवटले. सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीमुळे इंद्रायणीकाठी भक्तीचा महापूर आला होता. 

दरम्यान, बीजसोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने देहूतील सर्व रस्ते फुलून गेले होते. व्यावसायिकांचीही संख्या मोठी होती. मात्र, त्यांना पोलिसांनी रस्त्यावर अतिक्रमण करू न दिल्याने मुख्य रस्त्याने भाविकांना चालणे सुकर झाले होते. सकाळपासून देहूत सुरू असलेला गर्दीचा ओघ सांजवेळी ओसरत गेला. 

भंडारा डोंगरावरही गर्दी 
देहूत मुक्कामी असलेल्या भाविकांनी तुकोबारायांची साधना भूमी असलेल्या भंडारा डोंगरावर दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. अनेकांनी देहूतून भंडाऱ्यावर पायी जाणे पसंत केले. त्यामुळे डोंगराचा रस्ताही भाविकांनी भरून गेला होता. संत तुकाराम महाराज दशमी समितीच्या वतीने भंडारा डोंगरावर आलेल्या भाविकांना अन्नदान करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com