तूरडाळ सरकारी गोदामातच; रेशन दुकानांना पुरवठा नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

अन्नधान्य वितरण विभागाकडून शासनाकडे तूरडाळीची मागणी केली होती; परंतु उपलब्ध न झाल्यामुळे पुन्हा एक हजार 700 क्‍विंटल डाळीची मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येत असून, महिनाअखेर डाळ उपलब्ध होणे अपेक्षित आहे. 

- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी 

पुणे : अन्नधान्य वितरण विभागाने मागणी करूनही शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील तूरडाळ उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे सध्या रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे मागणी वाढली असताना तूरडाळ गायब झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. 

रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा दर 35 रुपये प्रतिकिलो आहे. अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेसह केशरी आणि पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड एक किलो तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येते. डाळीचा भाव खुल्या बाजारभावाच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे रेशनवरील डाळीला जास्त मागणी आहे. 

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात दर महिन्याला सुमारे अडीच हजार क्‍विंटल तूरडाळीची गरज भासते. दिवाळीत 533 क्‍विंटल डाळ शिल्लक होती. ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात अशी एकूण 403 क्‍विंटल डाळीची विक्री करण्यात आली. सध्या केवळ 130 क्‍विंटल डाळ शिल्लक आहे. त्यामुळे बहुतांश रेशन दुकानांमध्ये तूरडाळ मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. 

गहू, तांदूळ पुरेशा प्रमाणात 

रेशन दुकानात गहू, तांदूळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्‍ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येतो, तर अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ दिला जातो. गहू दोन रुपये किलो आणि तांदूळ तीन रुपये किलोप्रमाणे देण्यात येतो. 

चणा, उडीद डाळ नियमित मिळणार 

राज्य सरकारने यंदाच्या दिवाळीत चणाडाळ आणि उडीद डाळ पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली; परंतु यापुढील काळात रेशन दुकानांमध्ये तूरडाळीसोबत चणाडाळ आणि उडीद डाळही नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण विभागाकडून देण्यात आली. 

शिल्लक साठा 
सध्या रेशन दुकानांमध्ये 
चणाडाळ - 330 क्‍विंटल 
साखर - 216 क्‍विंटल 
उडीद डाळ - 13 क्‍विंटल 

Web Title: Turdal is in Godawn There is no supply to ration shops