रेशन दुकानातून तूरडाळ गायब

Turdal
Turdal

पुणे - रेशन दुकानातून कार्डधारकांना देण्यात येणाऱ्या तूरडाळीच्या दरात नुकतीच वाढ करण्यात आली असून, तूरडाळीचा दर सध्या प्रतिकिलो 55 रुपये आहे. त्यातच अन्नधान्य वितरण विभागाकडून तूरडाळीचा पुरवठा होत नसल्यामुळे रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. एकीकडे दरवाढ आणि दुकानात तूरडाळ नसल्याचा परिणाम थेट गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना बसत आहे.

गतवर्षी जुलै महिन्यात खुल्या बाजारात तूरडाळीचे दर वाढले होते. त्यामुळे राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने तूरडाळीचा दर 55 रुपये प्रतिकिलोवरून 35 रुपयांवर आणला. तूरडाळीचे दर 20 रुपयांनी कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु, तो काही महिन्यांपुरताच. गेल्या दिवाळीत तूर आणि हरभराडाळ उशिरानेच पोचली. रेशन दुकानदारांना तूरडाळ 31 रुपयांनी मिळत होती. त्यांना किलोमागे चार रुपये कमिशन मिळत होते. परंतु, तूरडाळीचे दर वाढविण्यात आले. मार्चपर्यंत तूरडाळ 45 रुपये किलो दराने मिळाली.

एप्रिलनंतर दर वाढत वाढत 55 रुपयांपर्यंत पोचले आहेत. आता रेशन दुकानदारांना तूरडाळीत किलोमागे केवळ दीड रुपये कमिशन मिळते.
खुल्या बाजारात तूरडाळीचा दर प्रतिकिलो 72 ते 82 रुपये आहे. दुष्काळी परिस्थितीत तूरडाळ महागल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे.

दिवाळीनंतर एक-दोन महिने तूरडाळ मिळाली, पण दर्जा चांगला नव्हता. मागणी करूनही तूरडाळ मिळत नाही. पुरवठा विभागाने कार्डधारकांना चांगली तूरडाळ द्यावी. वाहतूक खर्च आणि महागाई पाहता कमिशनमध्येही वाढ करावी.
- रेशन दुकानदार, मुंढवा परिसर

चार-पाच महिन्यांपासून रेशनवर तूरडाळ मिळालेली नाही. सरकारने डाळीचे दरही वाढवले आहेत. गरीब कार्डधारकांना स्वस्त दरात तूरडाळ उपलब्ध करून द्यावी.
- माला पवार, केशवनगर

तूरडाळीचे मार्च ते मे या तीन महिन्यांचे नियतन उपलब्ध झाले आहे. येत्या दहा-पंधरा दिवसांत रेशन दुकानांमधून पुरेशा प्रमाणात तूरडाळ उपलब्ध होईल. पुढील महिन्यात गहू आणि तांदूळ यासोबतच तूरडाळ देण्याचा प्रयत्न राहील.
- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे

पुणे शहरातील शिधापत्रिकाधारक
बीपीएल अंत्योदय केशरी (प्राधान्य गट) केशरी (प्राधान्य गट नसलेले) शुभ्र
24336   9977    330933    469834  160345

एकूण शिधापत्रिकाधारक - 9 लाख 95 हजार 425

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com