जुन्नरच्या महिला सक्षमीकरणाचा ढोल राज्यामध्ये घुमवू : शरद सोनवणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

जुन्नरच्या महिला सक्षमीकरणाचा ढोल राज्यांमध्ये घुमवू या असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी, नुकतेच राजुरी ( ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छंदी महिला ढोल ताशा पथकाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना केले.

आळेफाटा : जुन्नरच्या महिला सक्षमीकरणाचा ढोल राज्यांमध्ये घुमवू या असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी राजुरी ( ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छंदी महिला ढोल ताशा पथकाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना केले.

राजुरी येथे जुन्नर पर्यटन विकास संस्था अंतर्गत स्वच्छंदी कट्ट्याच्या माध्यमातून स्वच्छंदी महिला ढोल ताशा पथकाचे उदघाटन व  वाद्यपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांच्या हस्ते करण्यात आले.   

याप्रसंगी जुन्नरचे आमदार  शरद सोनवणे व त्यांच्या पत्नी सीमा सोनवणे, तसेच जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी व राजुरीचे सरपंच ज्ञानेश्वर शेळके हेही सपत्नीक उपस्थित होते. यावेळी बचत गटांची चळवळ तालुकाभर उभारून 5000 पेक्षाही जास्त महिलांना एकत्र आणून त्यांना रोजगार देण्याचे काम केलेल्या सुंदरताई कुऱ्हाडे, जुन्नरच्या निसर्ग व दुर्मिळ वनस्पतींचा अभ्यास करून २५ संशोधन प्रबंध लिहिणाऱ्या प्राध्यापिका डॉ. सविता रहांगडळे, पाणलोट विकास व जलसंधारण कामांचा पादीरवाडी पॅटर्न राबविणाऱ्या  वैशाली रवींद्र देवकर व वैशाली संजय देवकर, तसेच सीमाताई सोनवणे यांचाही सन्मान करण्यात आला. 

यावेळी जुन्नर पर्यटन चळवळ व जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने, जुन्नर तालुका विशेष पर्यटन क्षेत्र घोषित झाल्याबद्दल आमदार शरद सोनवणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी जुन्नरचे धर्मेद्र कोरे, यश मस्करे, जितेंद्र देशमुख; लेण्याद्रीहून जितेंद्र बिडवई, जयवंत डोके; खोडदचे विजय गायकवाड, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, सुभाष कुचिक, तुषार आंधळे, आळेफाटाचे डॉ वायकर, डॉ. संजय देवकर, श्री. वाळूंज ही पर्यटन चळवळीतील मंडळी उपस्थित होती.  

राजुरी गावामध्ये जुन्नर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील पहिले फक्त महिलांचे स्वच्छंदी महिला ढोल ताशा पथक सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिलांनी नम्रता हाडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित येऊन 2015 साली, व्यक्त होण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून स्वच्छंदी कट्ट्याची सुरवात केली. त्याअंतर्गत भजन व टाळ शिकणे, पर्यटन करणे, योग अभ्यास व आरोग्य शिबिर, व्यावसायिक प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छंदी कट्ट्या अंतर्गतच महिला ढोल ताशा पथक हा नवीन उपक्रमास महिला व मुलींचा उदंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.  

जुन्नरचे आमदार आपला माणूस शरद सोनवणे यांनी एकरकमी ८५ हजार रुपये स्वच्छंदी कट्ट्याच्या ढोल ताशा पथकाच्या साहित्य खरेदीसाठी दिले असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांनी आत्मविश्वासाने या उपक्रमात सहभागी होऊन जुन्नरच्या सांस्कृतिक वैभवात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी सोनावणे यांनी केले.

जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज हाडवळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नम्रता हाडवळे यांनी, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन मनीषा घंगाळे यांनी केले.  

Web Title: Turn the drum of Junnars womens empowerment into the state