esakal | अवघ्या 24 तासात बारामतीतील युवकाच्या खूनाचा उलगडा
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati Case

- बारामती तालुक्यातील मेखळी येथील वैभव लोंढे या 22 वर्षीय युवकाचा ओढणीने गळा आवळून बुधवारी (ता. 21) रात्री उशीरा मेडदनजिक खून झाला होता.

- पोलिसांच्या नजरेने अचूकपणे गुन्हेगाराने सोडलेला माग टीपला आणि अवघ्या 24 तासात खूनाचा उलगडा झाला.

अवघ्या 24 तासात बारामतीतील युवकाच्या खूनाचा उलगडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : कायद्याचे हात लांब असतात आणि गुन्हा करणारा काहीतरी माग सोडूनच जातो असे म्हटले जाते. बारामतीत झालेल्या खूनाबाबतही असेच घडले, पोलिसांच्या नजरेने अचूकपणे गुन्हेगाराने सोडलेला माग टीपला आणि अवघ्या 24 तासात खूनाचा उलगडा झाला. 

बारामती तालुक्यातील मेखळी येथील वैभव लोंढे या 22 वर्षीय युवकाचा ओढणीने गळा आवळून बुधवारी (ता. 21) रात्री उशीरा मेडदनजिक खून झाला होता. खून झाल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांच्यासह इतर अधिका-यांनी घटनास्थळास भेट दिली व तपासाची दिशी निश्चित केली. पोलिसांनी मोटारसायकलच्या क्रमांकावरुन यातील मृत्यूमुखी पडलेल्या युवकाची ओळख पटविली. मात्र ही ओळख पटवितानाच खून घडला तेथे पोलिसांना बटणे मिळाली. 

विशेष म्हणजे महिलांच्या ब्लाऊजचे हे बटण असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. त्या नंतर कोणत्या लेडीज टेलरकडे अशी बटणे आहेत याचा शोध सुरु झाला. एका टेलरकडे ही बटणे मिळाल्यानंतर कोणाच्या ब्लाऊजला ही बटणे लावली इथपर्यंत पोलिस जाऊन पोहोचले. टेलरने अचूकपणे कोणी ही बटणे वापरली ते सांगितल आणि पोलिसांनी संबंधित महिलेला बोलते करताच या खूनाचा उलगडा झाला. 

या खून प्रकरणी मंगल सूर्यवंशी (वय 29, रा. शारदानगर, माळेगाव, ता. बारामती) व गणेश कोळी (वय 31, रा. माळेगाव ता. बारामती) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असल्याचे पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले. फौजदार बाळासाहेब जाधव, सुरेश भोई यांनी या प्रकरणाचा शिताफिने छडा लावत संशयितांना ताब्यात घेतले. 
 

loading image
go to top