ताम्हिणीत ओढयात खाजगी बस कोसळून दोघांचा मृत्‍यु; बावीस जखमी 

pune.jpg
pune.jpg

माले : कोकणात फिरायला निघालेल्‍या खाजगी बस पुणे-कोलाड रस्‍त्‍यावरील ताम्हिणी (ता.मुळशी) येथील खोल ओढयात पडल्‍याने एका महिलेचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यु झाला. या अपघातात इतर बावीस जण जखमी झाले. जखमींमध्‍ये वृध्‍द, महिलांचा समावेश आहे. शनिवारी (ता.२७) पहाटे अडीच वाजता हा अपघात घडला. 

अपघातात संजीवनी निवृत्‍ती साठे (वय - ५३, रा.औंध, पुणे) व योगेश पाठक (रा.नवी पेठ, पुणे) या दोघांचा मृत्‍यु झाला. याबाबत आर्य जयेश केळकर, (वय - १६, रा.वारजे, पुणे) याने पोलिसांत खबर दिली. तर पुनम योगेश लांडे, हर्षवर्धन योगेश लांडे, दक्ष जाधव, रियांश जाधव, ऋषा जाधव, ऋ‍षीकेश कोंढाळकर, शितल विशाल काळे, विशाल  शिवाजी काळे, लौकिक विशाल काळे, स्मिता विलास सुर्यवंशी, रेश्‍मा प्रशांत जाधव, पुष्‍पा कोंढाळकर, बाळासाहेब पवार, तनिष्‍का गोफणे, माणिक काळे, निवृत्‍ती साठे, अनघा जाधव, अनिल पवळे, प्रभा पवार, विधिता जाधव, श्रावणी पाठक, वाहनचालक (नाव माहित नाही) हे जखमी झाले. यात वाहनचालक व इतर दोघांना जास्‍त मार लागला आहे. इतर अनेकांना मुक्‍का मार लागला आहे. सुदैवाने सर्व लहान मुले किरकोळ मार वगळता सुखरुप आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अपघातातील सर्वजण एकमेकांचे नातेवाईक, मित्र आहेत. कोकणात केळशी येथे फिरायला जाण्‍यासाठी पहाटे एक वाजता पुण्‍याहून खाजगी मिनीबसने (एम एच १२, केक्‍यु ६७६८) निघाले. पहाटे अडीच वाजताच्‍या दरम्‍यान ताम्हिणी गावच्‍या अलिकडील वळणावर असलेल्‍या वाघुरणेच्‍या ओढयात मिनीबस कोसळली. पंधरा ते वीस फुट खोल कोरडया ओढयात बस कोसळुन पलटी झाल्‍याने अनेकांना मोठया प्रमाणात मार लागला. अनेकजण अडकुन बसले होते. अपघातानंतर आर्य याने सर्व लहान मुलांना बाहेर काढले. नंतर इतर लोक जमेल तसे बाहेर येऊन मदतीसाठी येणाऱ्यां जाणाऱ्य़ांना थांबवु लागले. रात्रीचा अंधार व मोबाईलला रेंज नसल्‍याने मदत मिळण्‍यात अडथळे येत होते. ताम्हिणी, आदरवाडी, मुळशी खुर्द येथील स्‍थानिक माजी सरपंच संदिप बामगुडे, मयुर पासलकर, राम शिंदे आदींनी जखमींना बाहेर काढण्‍यास मदत केली. मावळा प्रतिष्‍ठाणचा अॅम्‍ब्‍युलन्स चालक कानिफनाथ गायकवाड यांनी मोठी मदत केली. संजीवनी साठे यांचा उपचारांपुर्वीच तर योगेश पाठक यांचा उपचारांदरम्‍यान मृत्‍यु झाला. १०८ क्रमांकाच्‍या पौड, माण, वारजे येथील रुग्‍णवाहिकांनी जखमींना पौड ग्रामीण रुग्‍णालय, मुळशी रुग्‍णालय, औंध रुग्‍णालय येथे नेण्‍यात आले. 

आर्यचे प्रसंगावधान
आर्य जयेश केळकर (वय - १६) हा आपल्‍या आई वडिलांसह वारजे येथे राहतो. त्‍याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. अपघातावेळी आर्य जागाच होता. त्‍याला दुखापत झाली नाही. त्‍याने तत्‍काळ स्‍वतःला अपघाताच्‍या धक्‍क्‍यातुन सावरलं. खिडकीतून बाहेर पडला.  सर्वत्र अंधार, आरडाओरडा असतानाही त्‍याने प्रसंगावधान दाखवत लहान मुलांना शोधुन गाडीबाहेर काढण्‍यास सुरवात केली. एक एक करत सर्व लहान मुलांना त्‍याने सुखरुप बाहेर काढले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com