जलतरण तलावामध्ये  जुळ्या बहिणी पडल्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

गोकूळनगर - जलतरण तलावाभोवती खेळणाऱ्या आठ वर्षांच्या जुळ्या बहिणी पाण्यात पडल्याची घटना रविवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. दरम्यान, मुलींचे कुटुंबीय व सोसायटी व्यवस्थापनाने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. कोंढवा खुर्द येथील एच. एम. रॉयल सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. 

गोकूळनगर - जलतरण तलावाभोवती खेळणाऱ्या आठ वर्षांच्या जुळ्या बहिणी पाण्यात पडल्याची घटना रविवारी दुपारी पावणेबारा वाजता घडली. दरम्यान, मुलींचे कुटुंबीय व सोसायटी व्यवस्थापनाने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. कोंढवा खुर्द येथील एच. एम. रॉयल सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

बतुल व हुसेना बाबरवाला अशी जलतरण तलावामध्ये पडलेल्या मुलींची नावे आहेत. एच. एम. रॉयल ही नवीन सोसायटी आहे. त्यामुळे सोसायटीचे व्यवस्थापन अद्यापही संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडूनच केले जाते. सोसायटीमध्ये चार फूट खोलीचा जलतरण तलाव आहे. त्याच्या देखभाल- दुरुस्तीचे काम रविवारी सुरू होते. त्या वेळी बतुल व हुसेना या तेथे खेळत होत्या. चालत असताना तलावाच्या पुलावरून पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. तेथे काम करणाऱ्यांनी त्यांना तत्काळ बाहेर काढून स्थानिक रुग्णालयात हलविले. त्यानंतर खासगी रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केले. बतूलच्या तब्येतीत सुधारणा होत असून हुसेना व्हेंटिलेटरवर आहे. दोघींच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी सोसायटीतील रहिवाशांनी सोमवारी सामूहिक प्रार्थना केली. 

आमच्या मुली रविवारी दुपारी पाण्यात पडल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले. एक मुलगी बरी झाली असून, दुसरी व्हेंटिलेटरवर आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. 
- बतुल व हुसेनाची आई 

जलतरण तलावाच्या देखभाल- दुरुस्तीचे काम सुरू होते, त्या वेळी ही घटना घडली. दोघींनाही तत्काळ रुग्णालयात नेऊन उपचार सुरू केले आहेत. 
- राहुल पाटील, प्रकल्प अधिकारी, एच. एम. रॉयल सोसायटी 

कोंढव्यामधील जलतरण तलाव असणाऱ्या सोसायट्यांनी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- अनिल पाटील, पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे 

Web Title: Twin sisters fell in the swimming pool