दोन आरोपींचे पलायन

दोन आरोपींचे पलायन

राजगुरुनगर - खेड पोलिसांच्या कोठडीत असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांनी कोठडीच्या खिडकीचे गज कापून पलायन केल्याची घटना काल पहाटे घडली. या वर्षी एप्रिल महिन्यात ट्रकचालकाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून लुटल्याच्या प्रकरणातील हे दोन आरोपी होते. विशाल दत्तात्रेय तांदळे ( वय २२, रा. मंचर, ता. आंबेगाव) व राहुल देवराम गोयेकर (वय २६, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत, जि. नगर) अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, या वर्षी २३ एप्रिल रोजी रात्री पुणे-नाशिक महामार्गावर शिरोली फाट्याजवळ रात्री एक ट्रक बंद पडला होता. त्या ट्रकचालकाला या दोघांनी कुऱ्हाडीचा धाक दाखवून १९ हजार रुपये व ऐवज लुटून नेला होता. त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, आळेफाटा येथील एका गुन्ह्यात त्यांना अटक झाली. त्या वेळी त्यांनी राजगुरुनगर येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून त्यांना १६ ऑक्‍टोबर रोजी खेड पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले. त्यांना १७ ऑक्‍टोबर रोजी खेड न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने प्रथम त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी दिली. त्यानंतर २० ऑक्‍टोबर रोजी न्यायालयाने पुन्हा ३ दिवसांची पोलिस कोठडी दिली. ती आज (२२ ऑक्‍टोबर) संपणार होती. त्यांना खेड तहसील कार्यालयाजवळ असलेल्या दगडी कोठडीतील एका खोलीत अन्य चार आरोपींसोबत ठेवण्यात आले होते. आज पहाटे चार वाजण्याच्या पूर्वी खोलीच्या शौचालयाच्याजवळ असलेल्या खिडकीचे गज हेक्‍झा ब्लेडने कापून आणि खिडकीला लावलेल्या जाळ्या उचकटून त्यांनी कोठडीच्या मागच्या बाजूने पलायन केले. 

पोलिसांना थांगपत्ताही नाही
कोठडीच्या पहाऱ्यावरील पोलिसांना याचा थांगपत्ताही लागला नाही. पहाटे चार वाजता पहाऱ्यावरील पोलिस बदलताना संबंधित त्या ठिकाणी पाहण्यास गेला, तेव्हा सोबतच्या एका आरोपीने दोन आरोपी पळून गेल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कोठडीच्या मागच्या बाजूला जाऊन पहिले असता, त्या ठिकाणी विटा रचलेल्या दिसल्याने आरोपीच्या बाहेरच्या साथीदारांनी त्यांना पळून जाण्यास मदत केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com