25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. 

पुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. 

या प्रकरणी मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडणीच्या आरोपावरून मनीष रमेश चावडा (वय 34, रा. रास्ता पेठ) आणि तेजस विलास भोर (वय 21, रा. भोरवाडी, कांदिली, जुन्नर) यांना अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदाराचा मजूर पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे लुल्लानगरमध्ये कार्यालय आहे. संबंधित कंत्राटदार हा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना चावडा त्याच्या वर्गात होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर चावडाचा त्यांच्याशी संपर्क नव्हता. दरम्यानच्या काळात कंत्राटदाराचा मोबाईल क्रमांक चावडाला मिळाला. त्याने 12 नोव्हेंबर रोजी संबंधित कंत्राटदाराला फोन करून दहा लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर पुन्हा फोन करून 20 आणि नंतर 25 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. त्यामुळे कंत्राटदाराने गुन्हे शाखेत खंडणीविरोधी पथकाचे निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार कंत्राटदाराने पैसे घेण्यासाठी बोलविले. तेव्हा तेजस पैसे घेण्यासाठी रास्ता पेठेत शाहू उद्यानाजवळ मंगळवारी रात्री आठच्या सुमारास आला. त्या वेळी दबा धरून बसलेल्या खंडणीविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि त्यानंतर चावडालाही ताब्यात घेऊन अटक केली. चावडा सेल्समन म्हणून काम करीत असे. सुमारे सहा महिन्यांपासून तो बेरोजगार आहे. समर्थ पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: Two arrested for demand ransom Rs 25 lakh