उष्माघाताच्या रुग्णांसाठी दोन खाटा राखीव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

पुणे - उष्णतेची लाट पसरत असल्याने राज्यात उष्माघाताची शक्‍यता वाढली आहे. उष्माघात झालेल्या रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार करता यावेत, यासाठी सरकारी रुग्णालयांमधील दोन खाटा राखीव ठेवण्याची सूचना आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळ कार्यालयाने मंगळवारी दिली आहे. 

पुणे - उष्णतेची लाट पसरत असल्याने राज्यात उष्माघाताची शक्‍यता वाढली आहे. उष्माघात झालेल्या रुग्णाला तातडीने वैद्यकीय उपचार करता यावेत, यासाठी सरकारी रुग्णालयांमधील दोन खाटा राखीव ठेवण्याची सूचना आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळ कार्यालयाने मंगळवारी दिली आहे. 

राज्यात दरवर्षी एप्रिल ते जून यादरम्यान उष्माघाताच्या काही घटना घडतात. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात उन्हाचा चटका वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमधील प्रत्येक सरकारी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी आवश्‍यकतेनुसार खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचनाही खासगी रुग्णालयांना लवकरच देण्यात येतील. 

उष्माघाताने नागरिकांचा होणारा मृत्यू टाळण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. रुग्णाला तातडीने योग्य औषधोपचार मिळतील अशी व्यवस्था प्रत्येक सरकारी रुग्णालयात करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. उन्हाच्या वाढत्या चटक्‍याबरोबर उष्माघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक सरकारी रुग्णालयातील दोन खाटा उष्माघाताच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, पुणे परिमंडळ. 

यांनी अवश्‍य काळजी घ्या 
- 65 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती 
- एक ते पाच वर्षे वयोगटातील मुले-मुली 
- गरोदर माता 
- मधुमेह आणि हृदयविकाराचे रुग्ण 
- अतिउष्ण वातावरणात काम करणाऱ्या व्यक्ती 
- उष्माघाताची कारणे 
- उन्हात शेतावर किंवा इतर ठिकाणी मजुरी करणारे 
- कारखान्याच्या बॉयलरजवळ काम करणारे 
- घट्ट कपड्यांचा वापर करणारे 

प्रमुख लक्षणे 
- थकवा, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे 
- भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे 
- रक्तदाब वाढणे 

प्रतिबंधात्मक उपाय 
- वाढत्या तापमानात कष्टाची कामे करू नका 
- भरपूर पाणी प्यावे 
- मीठ, साखर, पाणी प्यावे 

उष्माघात झाल्यास हे तातडीने करा 
- रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे 
- गार पाण्याने अंघोळ घालावी 
- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात 
- आवश्‍यकतेनुसार सलाइन द्यावे 

Web Title: Two beds reserved for hemoglobin patients