दोन तुल्यबळ नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला

मीनाक्षी गुरव
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पुणे - आतापर्यंत परिसरात झालेली विकासकामे तसेच शेकडो कार्यकर्त्यांचा लवाजमा या जमा बाजू असलेले दोन विद्यमान नगरसेवक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक ९ मध्ये आमनेसामने आले आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी आमदार विनायक निम्हण यांची संपूर्ण प्रतिष्ठा प्रभागातील सेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पणाला लागली आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांनीही तेवढ्याच तोला-मोलाचे उमेदवार ताकदीने रिंगणात उतरवल्याने ही लढत चौरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

पुणे - आतापर्यंत परिसरात झालेली विकासकामे तसेच शेकडो कार्यकर्त्यांचा लवाजमा या जमा बाजू असलेले दोन विद्यमान नगरसेवक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक ९ मध्ये आमनेसामने आले आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी आमदार विनायक निम्हण यांची संपूर्ण प्रतिष्ठा प्रभागातील सेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पणाला लागली आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांनीही तेवढ्याच तोला-मोलाचे उमेदवार ताकदीने रिंगणात उतरवल्याने ही लढत चौरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

जुन्या प्रभागातील तीनही नगरसेवकांनी नव्या प्रभागात उमेदवारीवर हक्क सांगितलेला बाणेर-बालेवाडी-पाषाण हा प्रभाग आहे. नगरसेवक सनी निम्हण (शिवसेना) यांच्या जुन्या प्रभागातील ४० टक्के भाग या नव्या प्रभागात येत आहे. निम्हण यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे गट ड मध्ये उभे आहेत. चांदेरे यांनी प्रभागात केलेली विविध विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे, तर निम्हण यांनाही येथील विकासकामांत यापूर्वी जातीने लक्ष घातले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विनायक निम्हण यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसमध्ये असलेले त्यांचे पुत्र सनी निम्हण हेदेखील शिवसेनेत गेले; परंतु त्यापूर्वी निम्हण कुटुंबीयांनी या भागातील विकासकामांना हातभार लावलेला आहे. म्हणूनच निम्हण यांनी या प्रभागात निवडून येण्यासाठी संपूर्ण ताकदपणाला लावली आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असले तरीही, भाजपने येथे जाणीवपूर्वक लक्ष वाढविले आहे. भाजपनेही या गटात राहुल कोकाटे यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसची आपल्या पारंपरिक मतदारांवर भिस्त असली तरीही, या प्रभागात खुल्या गटातून (क) काँग्रेसचे रोहित धेंडे हे एकच उमेदवार आहेत. 

या प्रभागातील महिलांसाठी आरक्षित दोन जागांपैकी एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, तर दुसरी जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहे. उर्वरित दोन्ही जागा खुल्या आहेत. शिवसेनेने सनी निम्हण यांच्याबरोबरच नीता रणपिसे, रोहिणी धनकुडे, संजय निम्हण यांना रिंगणात उतरविले आहेत. चांदेरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने विद्या बालवडकर, नीलिमा सुतार, प्रमोद निम्हण यांना उमेदवारी दिली आहे. भाजपतर्फे कोकाटे यांच्यासह स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अमोल बालवडकर हे रिंगणात आहेत. या प्रभागात पक्षाच्या पॅनलनुसार मतदान झाल्यास त्या-त्या पक्षांच्या  महिला गटाला फायदा होण्याची शक्‍यता आहे.

शहरातील सर्वाधिक म्हणजे सुमारे ८५ हजार ३०० लोकसंख्या या प्रभागात असून, भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळातही हा प्रभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. या प्रभागात सुमारे ७० टक्के सोसायट्यांमध्ये राहणारे मतदार असून, शहरातील उच्चभ्रूंची अधिक वस्ती असलेला बाणेर, बालेवाडी आणि पाषाणचा काही भाग या नव्या प्रभागाला जोडला आहे. पाषाण, लिंक रस्ता, सूस रस्ता, बालेवाडी फाटा, एनसीएल, ग्रीन पार्क, मेडिपॉइंट हॉस्पिटल, बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, सोमेश्‍वरवाडी असा विस्तीर्ण पसरलेला हा भाग प्रभागात समाविष्ट आहे. गेल्या तीन-चार वर्षांत या भागात सोसायट्यांनी डोके वर काढल्याने परिसराचे रूपही पालटले आहे. संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, विठ्ठलनगर, सर्व्हे क्रमांक एक हा वस्ती भागही येथे आहे. त्याशिवाय पाषाण, सुतारवाडी, सोमेश्‍वरवाडी, बाणेर आणि बालेवाडी हा गावठाण विभाग आहे. त्यात प्रामुख्याने बैठी घरेही आहेत. या प्रभागात प्रामुख्याने सुशिक्षित मतदारांचा भरणा अधिक असल्याने प्रचारासाठी ‘सोशल मीडिया’चा वापर प्रभावीपणे होत आहे. गेल्या काही वर्षांत परजिल्ह्यातून, परराज्यांतून येथे स्थायिक झालेल्या ‘कॉस्मोपॉलिटन’ मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे हे नवे मतदार कोणाला निवडून देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Two corporators reputation at stake