दोन सायकल ट्रॅक अस्तित्वात, वापर होत नसल्याचे उघड 

अवधूत कुलकर्णी
गुरुवार, 5 जुलै 2018

पिंपरी : सायकल चालविणे शारीरिक तंदुरुस्तीसाठी चांगले समजले जाते. नागरिकांना सायकल चालविण्याची सवय लागावी म्हणून महापालिकेने दोन ठिकाणी सायकल ट्रॅक सुरू केले आहेत. मात्र, शहरवासीयांना याचा पत्ताच नसल्याचे समोर आले आहे. 

पिंपरी : सायकल चालविणे शारीरिक तंदुरुस्तीसाठी चांगले समजले जाते. नागरिकांना सायकल चालविण्याची सवय लागावी म्हणून महापालिकेने दोन ठिकाणी सायकल ट्रॅक सुरू केले आहेत. मात्र, शहरवासीयांना याचा पत्ताच नसल्याचे समोर आले आहे. 
महापालिकेच्या लेखी नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी ते देहू-आळंदी, मुंबई-पुणे महामार्गावर हे तीन ट्रॅक आहेत. पदपथाला लागूनच ते केले आहेत. यापैकी नाशिक फाटा ते वाकड आणि काळेवाडी ते देहू-आळंदी या मार्गावर रस्त्याच्या कडेला एकूण पाच मीटरपैकी तीन मीटरवर सायकल ट्रॅक, तर दोन मीटर अंतराचा पदपथ आहे. परंतु, मुंबई-पुणे महामार्गावर साडेचार मीटरचा पदपथ आणि बाजूला दीड मीटर रुंदीचे उद्यान आहे. स्वतंत्र सायकल ट्रॅक नाही. 

या खेरीज सांगवी-किवळे या मार्गांवर बीआरटीएस मार्ग आहे. परंतु याच्या सायकल ट्रॅकबाबत माहिती महापालिकेकडून उपलब्ध होऊ शकली नाही. या चारही बीआरटी मार्गाच्या खर्चाचा काही हिस्सा राज्य सरकारने, तर काही महापालिकेने उचलला आहे. त्यामुळे त्यावर आतापर्यंत किती निधी खर्च झाला, याची माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पावर किती रक्‍कम खर्च झाली, याबाबत महापालिकेचे अधिकारीच अनभिज्ञ आहेत. 

पुण्यात काही भागांत सायकल ट्रॅक सुरू झाले आहेत. काही ठिकाणी भाडेपट्ट्यावर सायकलीही देण्यात येत आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये तसा प्रयोग सुरू झाला नाही. शहरातल्या मोठे रस्ते असलेल्या ठिकाणी सायकल ट्रॅक करता येईल. 

आकडे बोलतात 
मार्ग/ लांबी (किलोमीटरमध्ये)/ पैकी सायकल ट्रॅकची लांबी 
नाशिक फाटा ते वाकड/ 10.2/7.9 
काळेवाडी ते देहू-आळंदी मार्ग/13/8.9 
मुंबई-पुणे/12.5 /उपलब्ध नाही 
सांगवी-किवळे/14.5 / उपलब्ध नाही 

सायकल ट्रॅक तयार करत असताना काही भागांत रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे तिथे सायकल ट्रॅक नाही. उर्वरित मार्गावर ट्रॅक आहे. मात्र, त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. 
- प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका. 

शारीरिक तंदुरुस्तीसाठी सायकलचा वापर करा, असा संदेश दिला जातो. मात्र, दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सायकल कुणी चालवत नाही. नागरिकांनी सायकल चालवावी, यासाठी महापालिकेने विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज आहे. 
- जितेंद्र निखळ, नागरिक, चिंचवड 

सायकलचा वापर का नाही? 
साधारणपणे माणूस सायकलवर पाच किलोमीटरपर्यंत दररोज ये-जा करू शकतो. शहरातील औद्योगिक परिसर ते निवासी भागाचे अंतर यापेक्षा जास्त आहे. तसेच, दुचाकी, चारचाकी वापरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. 

 

Web Title: Two cycle tracks exist, open to use