दोन दिवसांत उन्हाचा चटका वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

पुणे - शहरात पुढील दोन दिवसांमध्ये उन्हाचा चटका वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने सोमवारी (ता. 10) व्यक्त केली. कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. शहरात कमाल तापमान 39.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर राज्यात भिरा येथे सर्वाधिक म्हणजे 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पुणे - शहरात पुढील दोन दिवसांमध्ये उन्हाचा चटका वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने सोमवारी (ता. 10) व्यक्त केली. कमाल तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. शहरात कमाल तापमान 39.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर राज्यात भिरा येथे सर्वाधिक म्हणजे 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

राजस्थानवरून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील उन्हाचा चटका वाढला आहे. त्याचा थेट परिणाम उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या भागावर होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये पुण्यासह या भागातील तापमानाचा पारा वाढण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली. 

पुण्यात वाढणार उन्हाचा चटका 
शहर आणि परिसरात पुढील दोन दिवसांमध्ये उन्हाचा चटका वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या शहरात कमाल तापमान 2.1 ने वाढून 39.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. किमान तापमानाचा पारा मात्र 0.3 अंश सेल्सिअसने कमी होऊन 18.4 अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुढील चोवीस तासांमध्ये कमाल तापमानाचा हा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार असून, येत्या बुधवारपर्यंत (ता. 12) 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यानंतर आकाश ढगाळ राहणार असल्याने उन्हाचा चटका कमी होईल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे. 

राज्यातील सोळा शहरांतील पाऱ्याने चाळिशी ओलांडली 
हवामान खात्यातर्फे नोंदविलेल्या राज्यातील प्रमुख 32 पैकी 16 शहरांमधील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील शहरांची संख्या जास्त आहे. विदर्भातील दहा शहरांपैकी सहा ठिकाणी तापमानाने चाळिशी ओलांडली होती, तर मध्य महाराष्ट्रात हे प्रमाण 11 पैकी 6 होते. मराठवाड्यातील चार शहरांपैकी तीन आणि कोकणातील सातपैकी एका शहरातील उन्हाचा चटका वाढला आहे. 

सौराष्ट्र, कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा 
सौराष्ट्र, कच्छच्या काही भागात, तसेच ओरिसा, तेलंगण, रॉयल सीमेच्या तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

Web Title: Two days increase temperature