भाऊबीजेला तो घरी येणार होता; पण...

prasad bendre
prasad bendre

पुणे : "भाऊबीजच्या दिवशी मुलाशी शेवटचे बोलणे झाले होते, ''दोन दिवसात घरी येतो.'', असं त्यानं आनंदाने सांगितले होते. मात्र, दोन दिवसांनी त्याचा मृतदेहच घरी आला.'', ओलावलेल्या डोळ्यांनी आवंढा गिळत सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान प्रसाद बेंद्रे यांच्या आई रेखा बेंद्रे या सांगत होत्या. ''मला जर आणखी एक मुलगा असता तर त्यालाही देशसेवेसाठी दिले असते'. '', अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

अवघ्या 27 वर्षांचे प्रसाद यांचे मणिपूरमधील इंफाळमध्ये नियुक्तीवर असताना दोन दिवसांपूर्वी निधन झाले. घरातील एकमेव कमावता पुरुष गेल्याने बेंद्रे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अस्वस्थ वाटत असल्याने प्रसाद यांना 3 नोव्हेंबरला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, 9 नोव्हेंबरला उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नसल्याचे बेंद्रे कुटुंबीयांनी सांगितले. शिवाजीनगर गावठणात सुमारे दहा - बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या प्रसाद यांनी उरुळी कांचनमध्ये नवे घर नुकतेच घेतले. तेथे रहायला जाण्याचा त्यांचा बेत सुरू होता. त्यासाठी ते 12 नोव्हेंबरला पुण्यात येणार होते. रेल्वे प्रवासाचे तिकिटही त्यांनी काढले होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले अन् त्यांच्या कुटुंबियांवर दुखाःचा डोंगर कोसळला. 

बेंद्रे यांच्या आई रेखा म्हणाल्या, "पती सतत आजारी असल्याने लोकांची धुणी-भांडी करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. स्वतःच्या नवीन घरात रहायला जावे, अशी मुलाची इच्छा होती. मात्र, ती पूर्ण होऊ शकली नाही. प्रसाद कशामुळे गेला, हे अजूनही समजलेले नाही. देशावरील प्रेमापोटी तो भरती झाला होता. त्याला असलेली आवड, अजूनही डोळ्यासमोर आहे. म्हणूनच त्याला भाऊ असता तर त्यालाही सैन्यातच पाठविले असतं.'' 

परिस्थितीशी झगडत असताना प्रसाद हे बारावीनंतर "बीएसएफ'मध्ये भरती झाले. चार मोठ्या बहिणींच्या पाठी प्रसाद यांचा जन्म झाला. सर्वात लहान असल्यामुळे त्यांचा घरात सर्वांना लळा होता. कुटुंबियांना चांगल्या पद्धतीने जगता यावे, यासाठी प्रसादने शिक्षण अर्ध्यावर सोडत कुटुंबाचा भार उचलला. प्रसाद यांचा विवाह दोन वर्षांपूर्वीच झाला. त्यांची पत्नी सायली सध्या गर्भवती आहेत. त्या म्हणाल्या, "दिवाळीमुळे प्रसाद वारंवार फोन करीत. व्हिडीओ कॉलही कधी कधी करायचे. प्रत्येकवेळी सगळ्यांची विचारपूस करायचे. दोन दिवसांपूर्वी शेवटचे बोलणे झाले तेव्हा, लवकरच घरी येत असल्याचे सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची खबर समजली अन असह्य धक्का बसला.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com