दौंड दोन दिवसांपासून अंधारात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

दौंड - दौंड शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात शेकडो झाडे उन्मळून पडली. झाडे व फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने शहराचा सोमवारी सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शहरातील जनजीवनासह राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांचे कामकाज विस्कळित झाले. 

दौंड - दौंड शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात शेकडो झाडे उन्मळून पडली. झाडे व फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने शहराचा सोमवारी सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शहरातील जनजीवनासह राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांचे कामकाज विस्कळित झाले. 

दौंड शहरात सोमवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे महादेव गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन प्रशासकीय इमारत मार्ग, दीपमळा, जनता कॉलनी, समतानगर, भीमनगर, रेल्वे हायस्कूल प्रांगण, गोकूळ हॉटेल रस्ता, पाटबंधारे वसाहत, डिफेन्स कॉलनी, मुख्य टपाल कार्यालय, महावितरण कार्यालय आदी भागांत रस्त्यावर झाडे पडून चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय वाहतूक विस्कळित झाली. महादेव मंदिरासमोरील झाड पडल्याने निंबाळकर बिल्डिंगला तडे गेले असून, लोखंडी अँगल वाकले आहे. झाडाखाली सापडल्याने राजेंद्र पगारिया व संजय पगारिया यांच्या वाहनांचे नुकसान झाले. शहरात अनेक इमारतींवरील सोलर पॅनेलसह घरावरील व घरासमोरील पत्रे वादळामुळे उडाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

महावितरणकडून धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याची मोहीम राबविण्यात आली होती; परंतु पावसानंतर ही मोहीम एक औपचारिकता म्हणून राबविण्यात आल्याचे समोर आले. दौंड नगरपालिकेची पावसाळ्यापूर्वीची स्वच्छतेची व अन्य कामे न झाल्याने शहराच्या अनेक भागांत पावसाचे पाणी तुंबल्याने नागरिकांची गैरसोय झाली. सोमवारी देऊळगाव राजे येथे ३६, दौंड शहरात २३ व रावणगाव येथे १९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. 

‘वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत पूर्ववत’
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे म्हणाले, ‘‘वीजवाहिन्यांवर पडलेली झाडे व फांद्या तोडण्याचे काम सोमवारी रात्रीपासून सुरू आहे. नवीन वीजवाहिन्या अंथरण्यासाठी प्रत्येकी चार ते पाच जणांचा समावेश असलेली सात पथके कार्यरत आहेत. शहराचा वीजपुरवठा उद्या (ता. ३०) सायंकाळपर्यंत पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’ 

भिंत पडून  महिलेचा मृत्यू
गिरीम (ता. दौंड) येथे सोमवारी वादळामुळे भिंत अंगावर पडून लताबाई एकनाथ थोरात (वय ५५) यांचा मृत्यू झाला. तिघे जण गंभीर जखमी झाले.
गिरीम येथील थोरात वस्ती येथे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जोरदार वादळामुळे थोरात कुटुंबीय गोठ्याच्या भिंतीच्या आडोशाला थांबले होते. वादळाच्या वेगामुळे भिंत अंगावर पडल्याने लताबाई थोरात यांचा मृत्यू झाला. मोहिनी एकनाथ थोरात (वय १७), मंदा शांताराम जगताप (वय ३२), शांताराम शंकर जगताप (वय ४२, तिघे रा. गिरीम) हे गंभीर जखमी झाले. महसूल खात्याने घटनास्थळी पंचनामा केला असून, या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: two days no electricity in daund