पुणे: उरुळीकांचनजवळ अपघातात दोन जण ठार

जनार्दन दांडगे
गुरुवार, 29 मार्च 2018

या अपघातात दत्ता दशरथ जाधव (वय- 26, रा. डाळींब ता. दौंड जि.  पुणे) व हरी गोविंद कांबळे (वय-24, रा. चिखली ता. मुखेड जि. नांदेड) हे दोघे जागीच ठार झाले. तर विष्णू मसाजी गजलवार (वय- 26, रा. माकनी ता. मुखेड जि.  नांदेड) व दत्ता सखाराम वाघमारे (वय- 25, रा. केदारकुंडा ता. देगलुर जि. नांदेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.  

उरुळीकांचन : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळीकांचन हद्दीत एरीगेशन काॅलनीसमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (ता. 28) मध्यरात्री बाराच्या सुमारास झाला आहे. 

या अपघातात दत्ता दशरथ जाधव (वय- 26, रा. डाळींब ता. दौंड जि.  पुणे) व हरी गोविंद कांबळे (वय-24, रा. चिखली ता. मुखेड जि. नांदेड) हे दोघे जागीच ठार झाले. तर विष्णू मसाजी गजलवार (वय- 26, रा. माकनी ता. मुखेड जि.  नांदेड) व दत्ता सखाराम वाघमारे (वय- 25, रा. केदारकुंडा ता. देगलुर जि. नांदेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.  

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वरील चारही जण बांधकाम मजुर असुन, रात्री बारा वाजनेच्या सुमारास महामार्गावरील एका हॉटेलमधुन जेवण उरकुन एका दुचाकीवरुन घराकडे निघाले होते. दुचाकी दत्ता जाधव चालवत होता. दुचाकी साखरे पेट्रोल पंपासमोर विरोधी बाजुच्या रस्त्यावर आली असता, दुचाकी अचानक घसरल्याने चौघेही पडले. त्याचवेळी मागुन आलेल्या वाहनाने धडक दिली. यात दोघे ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले.  

दरम्यान अपघाताची माहिती मिळाताच उरुळीकांचन पोलिसांसह कस्तुरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वैजिनाथ कदम व त्यांच्या सहकार्यानी जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. दोन्ही जखमींची पकॄती गंभीर आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.

Web Title: two dead in accident near UruliKanchan