
G20 Summit : जून महिन्यात जी २०च्या होणार दोन बैठका; ९ मे रोजी केंद्रीय पथक तयारीचा आढावा घेणार
पुणे : पुणे शहरात जानेवारी महिन्यात ‘जी २०’ परिषदेची बैठक झाल्यानंतर जून महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि शिक्षण या विषयावरील दोन बैठका होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून, प्रमुख २१ रस्त्यांची सुधारणा, सुशोभीकरण आणि शहर स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे. दरम्यान नऊ मे रोजी केंद्रीय पथक पुण्यात येऊन तयारीचा आढावा घेणार आहे.
यंदाच्या वर्षी भारताकडे ‘जी २० परिषदे’चे अध्यक्षपद आलेले आहे. जानेवारी महिन्यापासून देशाच्या विविध शहरांमध्ये यासंदर्भात बैठका होत आहेत. त्यासाठी जी २० चे सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी व भारताने निमंत्रित केलेल्या देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहात आहेत. अशा एकूण ४० शहरात २०० पेक्षा जास्त बैठका घेण्याचे नियोजन आहे. पुण्यातील पहिली बैठक जानेवारी महिन्यात पार पडली. त्यामध्ये वाढते शहरीकरण पायाभूत सुविधा आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करण्यात आली आहे.
जून महिन्यात लागोपाठ दोन बैठका पुण्यात होणार असून, त्याच्या तारखा निश्चीत झाल्या असल्या तरी त्या कुठे होणार हे अद्याप निश्चीत झालेले नाही. १२ व १४ जून या कालावधीत जी २० सदस्य देशांच्या इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर बैठक होणार आहे. तर १९ ते २२ जून दरम्यान शिक्षण विषयावर बैठक होणार आहे. या कालावधीत एकूण सात दिवस ‘जी २०’ सदस्य देशांचे प्रतिनिधी पुण्यात मुक्कामी असणार आहेत.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘इलेक्ट्रॉनिक्स समूहाच्या बैठकीसाठी संबंधित देशांचे प्रतिनिधी तर शिक्षणासंदर्भातील बैठकीसाठी प्रतिनिधींसोबत मंत्रीही सहभागी होणार आहेत. या बैठकीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ९ मे रोजी केंद्रीय पथक पुण्यात येणार आहे. बैठकीची संभाव्य ठिकाणे, सुविधांची, मार्गांची पाहणी केली जाणार आहे. तसेच हे बैठकीमध्ये सहभागी होणारे सदस्य पुण्यातील पर्यटन व वारसा स्थळांना भेटी देणार आहेत. त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही नियोजन आहे.
जी २० परिषदेच्या बैठकीसाठी यंदाही शहराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. रस्त्यांची डागडुजीही केली जाणार आहे. यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली जाईल. तसेच कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) ही मदत घेतली जाईल, असेही विक्रमकुमार यांनी सांगितले.
स्वच्छतेसाठी पुन्हा कारवाई
जी २० परिषदेच्या निमित्ताने रस्ते, पादचारी मार्ग, दुभाजक स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केलेले जातात. रंगरंगोटी व सुशोभीकरण केले जाते. पण बेशिस्त नागरिक पान, गुटखा खाऊन थुंकत असल्याने पुन्हा घाण आहे. त्यासाठी जानेवारी महिन्यात थुंकणाऱ्यांवर कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा ही कारवाई सुरू केली जाईल, असे कुमार यांनी सांगितले.