हृदय, कॅन्सरवरील उपचारांसाठी पालिकेकडून आता दोन लाख 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे - शहरी गरीब वैद्यकीय सहायता योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात एक लाख रुपयांनी वाढ केली गेली. हृदय, कॅन्सर आणि किडनी या विकारांवर उपचारांसाठी आता दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. 

पुणे - शहरी गरीब वैद्यकीय सहायता योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात एक लाख रुपयांनी वाढ केली गेली. हृदय, कॅन्सर आणि किडनी या विकारांवर उपचारांसाठी आता दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. 

महापालिकेच्या पॅनेलवरील खासगी रुग्णालयांमध्ये आंतररुग्ण विभागात उपचारांसाठी सीजीएस मान्य दराने उपचार केले जातात. यासाठी महापालिकेतर्फे एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद होती. संबंधित विकाराचे उपचार व तपासण्या महागड्या आहेत. प्रदीर्घ कालावधीसाठी उपचार घ्यावे लागतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना ते परवडत नाही. त्यामुळे या मदतीची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढविण्यात यावी, असा प्रस्ताव नगरसेवक योगेश समेळ, संदीप जऱ्हाड यांनी दिला होता. 

शहरी गरीब वैद्यकीय योजनेत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत आहे, असे पात्र ठरतात. शहरांत तीन वर्षे वास्तव असावे लागते. या योजनेत 2015 -16 मध्ये 8 हजार 914 , 2016 -2017 मध्ये 10 हजार 291 आणि संपलेल्या आर्थिक वर्षात 10 हजार 225 जणांना मदत दिली गेली आहे. 

स्थायी समितीने अतिरिक्त आयुक्त शीतल उगले आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्या परदेश दौऱ्याला मान्यता दिली आहे. बर्मिंगहॅम येथे 21 ते 25 मे या कालावधीत आहार या विषयावर परिषदेत चर्चा होणार आहे. या दौऱ्याचा खर्च टाटा ट्रस्ट ही संस्था करणार आहे. त्यास महापालिकेचा निधी खर्च होणार नाही. या परिषदेत गर्भवती महिलांचा आहार, बाळंतपणाचा आहार, याविषयी काय स्थिती आहे, त्यात काय सुधार करावेत, यावर चर्चा होईल. 

Web Title: two lakhs from the corporation for the treatment of cancer