खेडमध्ये सभापतिपदासाठी या दोघींना संधी 

राजेंद्र सांडभोर
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

ड तालुक्‍याचे सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने राजकीय रंगत निर्माण झाली आहे. पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला गटातून शिवसेनेकडून निवडून आलेल्या ज्योती अरगडे, वैशाली जाधव यांपैकी कोण सभापती होणार, याबाबत उत्सुकता आहे.

राजगुरुनगर (पुणे) : खेड तालुक्‍याचे सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने राजकीय रंगत निर्माण झाली आहे. नवीन सभापती कोण होणार, याबाबत तालुक्‍यात उत्सुकता आहे. पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला गटातून शिवसेनेकडून निवडून आलेल्या ज्योती अरगडे, वैशाली जाधव यांपैकी कोण सभापती होणार, याबाबत उत्सुकता आहे. 

खेड पंचायत समितीत चौदापैकी शिवसेनेचे 8 सदस्य आहेत. सभापतिपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या आरक्षणातून महाळुंगे गणातून कॉंग्रेसचे अमोल पवार आणि चऱ्होली खुर्द गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण चौधरी हेही निवडून आले आहेत. तसेच, शिवसेनेकडून सर्वसाधारण गटातून निवडून आलेले अंकुश राक्षे, सर्वसाधारण महिला गटातून निवडून आलेल्या सुनीता सांडभोर व नायफड गणातून निवडून आलेले भगवान पोखरकर यांच्याकडेही कुणबी जातीचा दाखला आहे. त्यामुळे त्यांनाही संधी आहे. पोखरकर हे सध्या उपसभापती आहेत.

तसेच, उपसभापतिपदावर महिलेची वर्णी लागणार की पुरुषाची, याचीही चर्चा आहे. सध्या अमर कांबळे हे या पदासाठीचे मुख्य इच्छुक मानले जातात. तसेच, अजूनही काही सदस्य या स्पर्धेत आहेत. 

दरम्यान, पदाधिकारी निवड करताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला संबंधित गणात मिळालेल्या मतांचा विचार होणार आहे. तसेच, राज्यात झालेल्या महाविकास आघाडीतील पक्ष या ठिकाणीही एकत्र येऊन वेगळा निर्णय घेणार का, याचीही उत्सुकता आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two members of the Shiv Sena have the opportunity to chair the Khed Panchayat Samiti