तब्बल दाेन महिन्यांनंतर आईच्या मृत्यूचा दाखला दिव्यांगाच्या हाती

तब्बल दाेन महिन्यांनंतर आईच्या मृत्यूचा दाखला दिव्यांगाच्या हाती

पुणे :  सेवा हमी कायद्यानुसार जन्म मृत्यूचा दाखला तीन दिवसांत द्यावा, अशी तरतूद आहे. परंतु कर्वेनगर भागात राहणाऱ्या दिव्यांग दिलीप शेंडे यांना मात्र आईचा मृत्यू दाखला मिळविण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यासाठी वेळोवेळी हेलपाटे व अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, फोनाफोनी यात जास्त वेळ गेला. 

शेंडे म्हणाले, '' 25 फेब्रुवारी रोजी माझ्या आईचा मृत्यू झाला. आम्हाला असे सांगण्यात आले की, पंधरा दिवसांत आईच्या मृत्यूचा दाखला मिळून जाईल. पण दोन महिने झाले तरी दाखला न मिळाल्याने शेवटी मी सामाजिक कार्यकर्ते अविनाश दंडवते यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी चौकशी केली असता कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याकडे गेलो. सर्व कागदपत्रांनिशी तेथे गेलो असता समजले की, त्यांना आईच्या मृत्यूच्या संदर्भातील रुग्णालयातून येणारा ' फॉर्म 4 ए ' चा मुख्य भाग मिळाला नाही. तेथील कामगारांनी आम्हाला 4 ए ची झेरॉक्‍स दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून आणायला सांगितली. हॉस्पिटलला फोन केला असता त्यांनी सांगितले की, आम्ही आमची प्रत कसबा क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवली आहे आणि त्यांच्याकडून पोचही मिळाली आहे. तुम्हाला जर परत कॉपी हवी असेल तर महापालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून त्याप्रमाणे पत्र आणावे लागेल. तरच आम्हाला ' फॉर्म 4 ए' ची झेरॉक्‍स कॉपी देता येईल. दंडवते यांनी वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले यांच्याशी संपर्क साधला आणि चक्रे फिरली. जर डॉ. पखाले यांनी हस्तक्षेप केला नसता तर दाखला मिळविण्यासाठी आणखी किती परवड झाली असती माहिती नाही. हा प्रसंग आणखी कोणावर येऊ नये एवढीच अपेक्षा आहे.'' 

अपुरे मनुष्यबळ ? 
महापालिकेने सेवा देण्याची हमी दिलेली असताना मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी एवढ्या अडचणी का येतात, याची चौकशी केली असता असे समजले की, कसबा क्षेत्रीय कार्यालयाकडे "डाटा एन्ट्री'साठी दहा कर्मचारी आहेत. त्यातील काही सुटीवर असल्याने पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या सर्व नोंदी करणे, 'बायडींग' आदी कामांचा त्यांच्यावरच ताण पडतो. पर्यायाने दाखले देण्यास विलंब होतो. या कार्यालयात आणखी पाच-सहा कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. 

'' सिटिझन रजिस्ट्रेशन सिस्टिम (सीआरएस) या नव्या प्रणाली नुसार आपण मृत्यूची नोंदणी करणे सुरू केले आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी आपल्या परिसरातील क्षेत्रीय कार्यालयाकडे पंधरा दिवसांत कागदपत्रे जमा करायची आहेत. त्या क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कागदपत्रे सहा दिवसांत कसबा क्षेत्रीय कार्यालयाकडे पोचतील. त्यानंतर चार दिवसांत मृत्यूचा दाखला, नागरिकांना त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयात मिळू शकेल.'' 
- डॉ. सूर्यकांत देवकर, वैद्यकीय अधिकारी, कसबा क्षेत्रीय कार्यालय 

''सेवा हमी कायद्यात जन्ममृत्यूचा दाखला तीन दिवसांत द्यावा असे स्पष्टपणे म्हटले आहे. हे तीन दिवस अंत्यसंस्कारानंतर पकडायला हवेत. वैकुंठातूनच या संदर्भातील नोंदी कसबा जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाकडे जायला हव्यात. तसे होताना मात्र दिसत नाही.'' 
- विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com