Breaking News : पुण्यात उभारलेल्या 100 कोटींच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये दोन रुग्ण दगावले, कारण... 

ज्ञानेश सावंत 
Sunday, 30 August 2020

पुण्यात कोरोना रुग्णांचा उपचाराअभावी अर्थात "व्हेंटिलेटर' आणि "ऑक्‍सिजन' नसल्याने मृत्यू होणार नाही; या उद्देशाने तब्बल शंभर कोटी रुपये खर्चून उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रविवारी दुपारी दोन रुग्णांचा श्‍वास कायमचा रोखला गेला. 

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांचा उपचाराअभावी अर्थात "व्हेंटिलेटर' आणि "ऑक्‍सिजन' नसल्याने मृत्यू होणार नाही; या उद्देशाने तब्बल शंभर कोटी रुपये खर्चून उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रविवारी दुपारी दोन रुग्णांचा श्‍वास कायमचा रोखला गेला. गंभीर म्हणजे, वेळेत आणि नेमके उपचार न मिळाल्यानेच या दोघांना आपला जीव गमवावा लागला.

Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

दरम्यान, या सेंटरमधील सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने उपचाराच्या आशेने गेलेल्या एका महिलेसह पुरुष रुग्णांवर मृत्यू ओढवला. मात्र, रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना आणल्याने या घटना घडल्या आहेत, असा बेजबाबदार खुलासा महापालिकेचे आरोग्य खाते करीत आहे. या सेंटरचे उदघाटन होऊन आज कुठे आठवडा झाला असतानाच रुग्ण दगावल्याचे पुणेकरांत चिंता पसरली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरीकडे, दोघा मृत व्यक्तींपैकी एक मृत रुग्ण नेमका कोठून आला ? त्याला सेंटरमध्ये कोणी आणले ? रुग्णाला आणलेली ऍम्ब्युलन्स कोणाची होती ? याचा कुठचाच थांगपत्ताही महापालिका आणि सेंटरभोवतील ठेवलेल्या सुरक्षा व्यवस्थेला नाही. परिणामी, रुग्णांना जम्बो म्हणजे, मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यासाठी उभारलेल्या सेंटरमध्ये उपचाराचा "जम्बो' गोंधळच सुरू असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट आहे. 

पुण्यात कोरोनाच्या अत्यावस्थ रुग्णांना नेमक्‍या वेळेत तेही मोफत व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजन पुरविण्यासाठी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) आवारात जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. सुमारे आठशे रुग्णांच्या व्यवस्थेची सुविधा बुधवारपासून सुरू झाली. त्यानंतर गरजू रुग्ण या सेंटरमध्ये उपचारासाठी येऊ लागले. मात्र, ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत नसल्याने रुग्णांना दाखल करून घेण्यास महापालिका टाळाटाळ करीत राहिली. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून कसेबसे रुग्ण दाखल करून घेतले जात आहेत; पण त्यांना ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर पुरविले जात नव्हते. त्यामुळे या सेंटरच्या उद्देशाला धक्काच बसला आहे. 

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​

अशाच परिस्थितीत जम्बोमध्ये बेड आणि उपचार मिळेल, या आशेने गेलेल्या रविवारी दुपारी सेंटरमध्ये नेलेल्या महिला आणि पुरुषाला वेळेत साधेही उपचार मिळाले नाहीत. अम्ब्युलन्समधून आलेल्या या अत्यावस्थ रुग्णांना एकाही डॉक्‍टराने ना तपासले, ना काही विचारपूस केली. त्यानंतरच्या काही मिनिटांत अत्यवस्थ रुग्णांनी जागेवरच आपला जीव सोडला. त्यानंतर मात्र, महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांसह सर्वच अधिकारी आपली जबाबदारी झटकत राहिले. रुग्णांचा जीव गेल्यानंतरही या घटना कशा घटल्या ? मृतांची "मेडिकल हिस्ट्री' काय आहे ? हे महापालिकेला ठाऊक नव्हते. या घटनेची माहिती घेण्यासाठी आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याशी सपंर्क साधला; मात्र ऑफिसमध्ये फाइलीं तपासत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एवढी गंभीर घटना घडूनही वरिष्ठांना फारसे गांभीर्य नसल्याचेही दिसून आले. 

या सेंटरचे उदघाटन गेल्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. ठाकरे-पवारांनी या सेंटरमधील सुविधांचे तोंडभर कौतुक करीत शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, ही व्यवस्था सुरू होऊन पाच दिवस झाले तरी एकाही रुग्णांवर नेमके उपचार झाले नसल्याचे चित्र आहे. उपचार काय तर साधे रूग्णांना दाखलही करून घेतले जात नाही, अशा अनेक तक्रारी आहेत.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two patients die at Covid Center in pune