दोन पोलिसांसह लिपिक "एसीबी'च्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी तीन ठिकाणी छापे टाकून शहर पोलिस दलातील हवालदारासह वरिष्ठ लिपिकाला, तर ग्रामीण पोलिस दलातील एका सहायक फौजदाराला लाच घेताना ताब्यात घेतले.

पुणे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी तीन ठिकाणी छापे टाकून शहर पोलिस दलातील हवालदारासह वरिष्ठ लिपिकाला, तर ग्रामीण पोलिस दलातील एका सहायक फौजदाराला लाच घेताना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील लिपिकाने सहायक पोलिस निरीक्षकाकडूनच लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. एकाच दिवशी पोलिसांवर झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. 

"एसीबी'चे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस आयुक्‍त सुहास नाडगौडा यांच्या पथकाने ही कारवाई केली. नाडगौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील पोलिस हवालदाराला खासगी व्यक्‍तीमार्फत भंगार व्यावसायिकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. निसार मेहमूद खान (वय 44) असे त्याचे नाव आहे. हडपसर येथील आनंदनगर परिसरातील भंगार व्यावसायिकावर चोरीचा माल खरेदी केल्याचा आरोप करून हवालदाराने 15 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून आनंदनगर परिसरात सापळा रचण्यात आला. खान याने खासगी व्यक्‍ती मेहंदी अजगर शेख याच्यामार्फत लाच स्वीकारली. याप्रकरणी पोलिस हवालदारासह दोघांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

अन्य एका घटनेत शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील लिपिकाने सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्‍चिती करण्यासाठी एका सहायक पोलिस निरीक्षकाला तीन हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्याने "एसीबी'कडे तक्रार दिली. त्यावरून मनोज हरी काळे (वय 52) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. 

तसेच, शिक्रापूर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस फौजदाराला 20 हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. अनिल बाबूराव कोळेकर (वय 54) असे संशयिताचे नाव आहे. कोळेकर याने तक्रारदाराला गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागितली होती.

Web Title: Two police with a clerk ACB trap

टॅग्स