
अपघाताच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बंडगार्डन पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता ही कारवाई केली.
पुणे - अपघाताच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बंडगार्डन पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता ही कारवाई केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
पोलिस हवालदार नीलकंठ रघुनाथ शेजाळे (वय ४५), पोलिस नाईक बप्पा भिकाजी गायकवाड (वय ४१) अशी अटक केलेल्या संशयित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्याकडून अपघाताचा गुन्हा घडला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. त्याबाबत न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते.
त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक करणे बंधनकारक होते. मात्र, शेजाळे व गायकवाड यांनी तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. या प्रकाराबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाने त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यानुसार, सोमवारी त्यांना आठ हजार रुपये देण्याचे ठरले होते. पोलिस निरीक्षक अलका सरग व गिरीश सोनवणे यांच्या पथकाने दोघांना अटक केली.