'त्या' ट्रकचालकाच्या खूनप्रकरणी दोघे ताब्यात

'त्या' ट्रकचालकाच्या खूनप्रकरणी दोघे ताब्यात

दौंड (पुणे) : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाचा मळद (ता. दौंड) येथे खून व दरोडा प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी लिंगाळी व गोपाळवाडी परिसरातून पाठलागानंतर ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यानंतर अवघ्या ६६ तासांत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, दौंड तालुक्यात मागील पंधरवड्यामधील लूटमारी, जबरी चोरी, आदी एकूण सहा गुन्ह्यांमधील त्यांचा सहभाग उघड झाला आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलाची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व दौंड पोलिसांनी संयुक्तरित्या एक एप्रिल रोजी ही कारवाई केली. समीर उर्फ सुरज किरण भोसले (वय १९, रा. एस्सार पंपामागे, गोपाळवाडी रस्ता, ता. दौंड) व गणेश अजिनाथ चव्हाण ( वय २२, रा. बोरावकेनगर, ता. दौंड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ३० मार्च रोजी लातूर येथून पुण्याकडे हरभरा डाळ घेऊन निघालेले ट्रकचालक काशिनाथ रामभाऊ कदम (वय ५५, रा. ढोकी, जि. उस्मानाबाद) यांचा दरोडेखोरांनी छातीवर चाकूने वार करून खून करीत त्यांच्याकडील ऐवज लुटला होता. त्याचबरोबर या महामार्गावर दरोडेखोरांनी टेम्पो मदतनीस महंमद मेहबूब पठाण (वय ४९, रा. उस्मानाबाद) यांच्यावर चाकूने वार करून जखमी करण्यासह टेम्पोचालक अल्ताफ खैय्यूम पटेल (रा. सेंद्री, जि. सोलापूर) यांच्याकडील रोख दोन हजार रूपये व पैशांचे पाकिट काढून घेत पळ काढला होता. 

लॅाकडाउन असताना ट्रकचालकाचा खून झाल्याने व कोणताही ठोस पुरावा नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. परंतु स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट व दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकांनी गुन्हेगारी टोळ्यांचा कसून शोध घेतला. १ एप्रिल रोजी सायंकाळी लिंगाळी वन क्षेत्र व गोपाळवाडी परिसरात पाठलागानंतर समीर भोसले व गणेश चव्हाण यांना पकडण्यात आले. टोळीतील अन्य फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. 

संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी मळद येथील खून व दरोड्याची कबूली दिली असून त्यांनी मागील पंधरवड्यात दौंड तालुक्यातील वरवंड, खडकी, स्वामी चिंचोली व लिंगाळी येथील लूटमारी व चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. 

सहायक निरीक्षक दत्तात्रय गुंड, ऋषीकेश अधिकारी, फौजदार रूपाली काटे, हवालदार अनिल काळे, रवी कोकरे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, काशिनाथ राजापुरे, आसिफ शेख, पांडुरंग थोरात, कचरू शिंदे, पंडीत मांजरे, श्री. सस्ते, पोलिस नाईक सुभाष राऊत, गुरु गायकवाड, ज्ञानेश्वर क्षीरसागर, बापू रोटे, जाधव, काळे, सूर्यवंशी, सचिन बोराडे, कॅान्स्टेबल शरद वारे, अमोल गवळी, श्री. राऊत, धनंजय गाढवे, सुरज गुंजाळ, श्रीगोंदा  (जि.नगर) पोलिस ठाण्याचे हवालदार अंकुश ढवळे आदींनी या कारवाईत भाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com