शिरूर तालुक्यातून दोन टेम्पो साहित्य पूरग्रस्तांसाठी

प्रा. नागनाथ शिंगाडे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

'एक भाकर पूरग्रस्त बांधवांसाठी'या अभियानांतर्गत तातडीची मदत म्हणून विविध खाद्य पदार्थ व इतर आवश्यक साहित्याचे दोन टेम्पोभरून आज (शनिवार) पाठविण्यात आले.

तळेगाव ढमढेरे (पुणे): कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'एक भाकर पूरग्रस्त बांधवांसाठी'या अभियानांतर्गत तातडीची मदत म्हणून विविध खाद्य पदार्थ व इतर आवश्यक साहित्याचे दोन टेम्पोभरून आज (शनिवार) पाठविण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या रांजणगाव गणपती येथील संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात गोळा केलेली मदत मान्यवरांच्या उपस्थितीत पाठविण्यात आली. यामध्ये श्री. पाचुंदकर व शिरूर तालुक्यातील 39 गावांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 5 हजार भाकरी, चिवडा, बिस्किटे, वेफर्स, चटणी, तांदूळ व खाद्यपदार्थ आणि आवश्यक इतर साहित्यांचा समावेश आहे. तसेच रांजणगावातील आराध्य फौंडेशनतर्फे चपात्या व चटणी पाठविण्यात आली.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या आवाहानानुसार ही मदत देण्यात आल्याचे श्री. पाचुंदकर यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे व पोपटराव गावडे, भिमाशंकर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, माजी सदस्य शेखर पाचुंदकर, पंचायत समिती सभापती विश्वास कोहकडे, माजी सभापती प्रकाश पवार, उद्योजक दत्तात्रेय पाचुंदकर, आत्माराम खेडकर, शिवाजीराव शेळके, केरूभाऊ कुटे, अमोल जगताप, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. आणखी दोन दिवसांनी 10 हजार भाकरी, खाद्यपदार्थ व जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात येणार असल्याचे श्री पाचुंदकर यांनी यावेळी सांगितले. पूराच्या पाण्यात बोट उलटून पाण्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two tempo materials from Shirur taluka for flood victims