पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : मौजमज्जा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणे सहा लाख रुपयांच्या 14 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या​

पुणे : मौजमज्जा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पावणे सहा लाख रुपयांच्या 14 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. 

जीवन बाजीराव खेडेकर (वय 21, रा. झेंडेवाडी, पुरंदर), अनुज रोहिदास भंडलकर (वय19, रा.गुऱ्होळी, पुरंदर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहनचोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसावा, यासाठी पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील हे पोलिस कर्मचारी प्रदीप गुरव व प्रणव सकपाळ यांच्यासमवेत सोमवारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी कात्रज कोंढवा रस्त्यावरील कात्रजजवळील उड्डाणपुलाखाली दोघेजण दुचाकीवर थांबले असून त्यांची हालचाल संशयास्पदरीत्या वाटत असल्याची खबर गुरव व सपकाळ यांनी मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक विष्णू पवार व पोलिस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोघांना सापळा रचून पकडले. 

संशयित आरोपींकडे दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी संबंधित दुचाकी चोरीची असून यापूर्वी पुणे शहर व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमधून 14 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच मौजमजा करण्यासाठी आपण दुचाकी चोरत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी 14 दुचाकी जप्त केल्या. त्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिस ठाणे पाच, सासवड पोलिस ठाणे तीन, सिंहगड, अलंकार, बिबवेवाडी, हडपसर व अन्य पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन चोरीस गेलेल्या प्रत्येकी एक अशा 14 दुचाकी जप्त केल्या. याबरोबरच वाहनचोरी करणाऱ्या सचिन चांगदेव निकम (वय 42, रा.भेकराईनगर, हडपसर) यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडूनही चोरीची एक दुचाकी जप्त करण्यात आली. 

 

Web Title: Two-wheeler thief arrested in pune