
पुणे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आले.
Pune Crime : दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; १६२ दुचाकी जप्त
पुणे - पुणे शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आले. गुन्हे शाखेच्या पथकांनी धडक कारवाई करत चोरट्यांकडून ५५ लाख रुपयांच्या १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी १७ आरोपींना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली.
शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार आणि नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.
गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथक लातूर, बीड आणि उस्मानाबाद भागात वेशांतर करून चोरट्यांच्या मागावर होते. त्यानुसार अजय रमेश शेंडे (वय ३२, रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे), सचिन प्रदीप कदम (वय ३२), परमेश्वर भैरवनाथ मिसाळ (वय २८), युवराज सुदर्शन मुंढे (वय २३, तिघे रा. गोविंदपूर, ता. कळंब, जि. धाराशिव) यांना अटक केली. त्यांच्याकडून १०० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

युनिट पाचच्या पथकाने संकेत नामदेव भिसे (वय २३), आदित्य बाळू मुळेकर (वय २०), वैभव नागनाथ बिनवडे (वय २०, तिघे रा. हडपसर) यांना अटक केली. त्यांच्याकडून १४ दुचाकी जप्त केल्या आहेत. युनिट चारच्या पथकाने राहुल राजेंद्र पवार (वय २१, रा. वाघोली), गौरव ऊर्फ पिंट्या मच्छिंद्र कुसाळे (वय ३८), संतोष अशोक कुमार सक्सेना ऊर्फ समीर शेख (वय २९, दोघे रा. येरवडा), प्रशांत ऊर्फ पप्पू सुबराव ठोसर (वय ३६, रा. आंबेडकर वसाहत, औंध) यांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक-२ ने किशोर उत्तम शिंदे (वय ३०, रा. मांजरी बुद्रूक), शाहीद कलिम शेख (वय १९, रा. वडगाव शेरी), अमन नाना कनचरे (वय १९, रा. चंदननगर), नागनाथ अश्रूबा मेढे (वय १९, रा. कात्रज) यांना अटक केली. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २१ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच, गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने भगवान राजाराम मुंडे (वय ३२, रा. परभणी) याला अटक केली. त्याच्याकडून १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
युनिट सहाचे पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, युनिट पाचचे पोलिस निरीक्षक उल्हास कदम, युनिट चारचे पोलिस निरीक्षक गणेश माने, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे सुनील पंधरकर आणि युनिट दोनचे पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
- पुणे शहरातून दुचाकी चोरून लातूर, धाराशिव, बीड परिसरात १५ हजार रुपयांना विक्री.
- बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी रेकी करून हॅंडल लॉक तोडून दुचाकी चोरी
- पुणे शहरातील १२२, पुणे ग्रामीण १०, पिंपरी चिंचवडमधील ६, सोलापूर ग्रामीण ५, सोलापूर शहर २, धाराशिव ३, वाशीम ५, अहमदनगर ५, बीड ३ आणि जालना जिल्ह्यातील एक असे एकूण १६२ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड.
गुन्हे शाखेची सर्वांत मोठी कारवाई
गुन्हे शाखेने २००८ नंतर दुचाकी चोरट्यांविरुद्ध केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक आणि विद्यमान सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार यांच्या पथकाने २००८ मध्ये ११० दुचाकी जप्त केल्या होत्या. तसेच, २०१२ मध्ये ८० मोटारी जप्त केल्या होत्या. त्यानंतर आता गुन्हे शाखेने १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत.