पुणे : स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना दोन वर्षांची मुदतवाढ

तब्बल ३७५ कोटी रुपयांचा निधीही मिळणार; मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याची सूचना
Smart City
Smart CitySakal

पुणे : स्मार्ट सिटी (smart city) अंतर्गत शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने (central goverment) दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या कालावधीत ३७५ कोटी रुपयांचा निधीही मिळणार आहे. केंद्र सरकारचा स्मार्ट प्रकल्प गुंडाळला जाणार, अशी चर्चा सध्या आहे. स्मार्ट सिटीचे मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्यात स्मार्ट सिटीचे सुरू असलेले प्रकल्प मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याची सूचना केली आहे. (Two year extension pune smart city projects)

मात्र, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देत असल्याचे पत्र अद्याप स्मार्ट सिटीची अंमलबजावणी होत असलेल्या शहरांना मिळालेले नाही. कोरोनामुळे स्मार्ट सिटीचे कामकाज सुमारे १४ महिने रखडले होते. या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ मिळाली आहे. तसेच स्मार्ट सिटीला पुढील दोन वर्षांत जेवढा निधी मिळणार आहे, तेवढ्याच निधीचे प्रकल्प हाती घेऊन ते मुदतीत पूर्ण करण्याची सूचना दिली आहे.

सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील प्रकल्प पूर्ण करण्यासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे राष्ट्रीय उदघाटन पुण्यात २०१६ मध्ये झाले होते. स्मार्ट सिटीचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मार्च २०२१ पर्यंत मुदत दिली होती.

"स्मार्ट सिटी प्रकल्पाला मुदतवाढ म्हणजे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने केलेला आणखी एक जुमला आहे. स्मार्ट सिटीचा पुण्यात गेल्या पाच वर्षांत बोजवारा उडाला. पुणे स्मार्ट सिटीला देशपातळीवर स्पर्धेत पर्यावरण, स्वच्छता, शहरी वाहतूक अशा कोणत्याही निकषावर स्थान मिळालेले नाही," अशी टीका कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी केली.

याबाबत बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, "स्मार्ट सिटी प्रकल्पांना मिळालेली मुदतवाढ स्वागतार्ह आहे. कोरोनामुळे सुमारे दीड वर्षे काम बंद होते. आता पुढील दोन वर्षांत कामांना गती येईल. त्यातून समान पाणी पुरवठा, ट्रान्स्पोर्ट हब, एटीएमएस आदी विविध प्रकल्प वेगाने पूर्ण करू. त्यातून पुणेकरांना सुविधा उपलब्ध होतील."

"स्मार्ट सिटीचे काम असमाधानकारक आहे. गेल्या चार वर्षांपासून अनेक प्रकल्प अपुरे आहेत. त्यामुळे खर्च वाढत चालला आहे. एक किलोमीटर रस्त्यासाठी ११ कोटी रुपये कसे खर्च करू शकते ? मोफत वाय-फायसारखे अनेक प्रकल्प फसले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी हा केवळ भ्रम आहे," असे स्मार्ट सिटीचे संचालक पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

दरम्यान, स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसाठी ६१३ कोटी रुपये आत्तापर्यंत मिळालेला निधी असुन, ५५० कोटी रुपये प्रकल्पांवर झालेला खर्च आहे. तर ३८७ कोटी रुपये मार्च २०२३ पर्यंत मिळणारा निधी आहे.

पुढील दोन वर्षांत पूर्ण होणारे प्रमुख प्रकल्प

  • संपूर्ण शहरासाठी समान पाणी पुरवठा योजना

  • १२५ चौकांसाठी ॲडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम

  • ट्रान्स्पोर्ट हब

  • बाणेर, बालेवाडी, औंध येथील ३८ किलोमीटर रस्त्यांचे विकसन

  • प्लेसमेकिंगचे २१ प्रकल्प

  • १२० चौकांची सुधारणा

  • रोड ॲसेसमेंट मॅनेजमेंट सिस्टीम

  • बालेवाडी क्रिडा संकुल

  • स्मार्ट पोल, ई टॉयलेट, स्मार्ट पार्किंग

  • ऑप्टिकल फायबर केबल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com