बिबट्याच्या हल्ल्यात जांबूतला चिमुकली ठार

TKH1.
TKH1.

वाढत्या हल्ल्याने भीतीचे वातावरण; बिबट्याला पकडण्यासाठी आठ पिंजरे लावले

टाकळी हाजी (पुणे) : जांबूत (ता. शिरूर) येथील जोरी-लवण वस्तीतून बिबट्याने समृद्धी योगेश जोरी (वय 2) या चिमुकलीवर झडप घालून तिला एक हजार फुटावर नेऊन ठार केले.ही घटना रविवारी (ता. 6) रात्री नऊच्या सुमारास घडली. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जोरी-लवण वस्तीतील खंडोबा मंदिराजवळ नवरात्र उत्सवानिमित्त रविवारी गरबा दांडियाचा कार्यक्रम सुरू होता. तेथून जवळच योगेश जोरी यांचे शेतात घर आहे. रात्री घराच्या उंबऱ्याजवळ समृद्धी उभी होती. त्यावेळी जवळच्या शेतातून बिबट्या आला, त्याने काही क्षणातच मुलीला उचलून नेले. हा प्रकार पाहून तिच्या आजीने आरडाओरडा करत बिबट्याच्या मागे धाव घेतली. एक हजार फुटावर असणाऱ्या विहिरीजवळ बिबट्याने समृद्धीला ठार मारले होते. या बाबत वनविभागाला माहिती देण्यात आली.त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

या बाबतची माहिती मिळताच सोमवारी सकाळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, सरपंच दामू घोडे, डॉ. जयश्री जगताप यांनी या कुटुंबाचे सांत्वन केले. बिबट्याला जेरबंद करत नाही; तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा या कुटुंबाने आणि परिसरातील ग्रामस्थांनी घेतला होता. त्यामुळे वन विभागाची तारांबळ उडाली होती. मात्र, आठ पिंजरे लावले असून बिबट्याला लवकरच पकडण्यात येईल, असे आश्‍वासन वन विभागाने दिल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला.

शिरूरचे वन अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले की,संबंधित कुटुंबाला तातडीने पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.लवकरच आणखी 10 लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल.या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आठ पिंजरे लावण्यात आले आहेत.ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. वन विभागाने दिलेल्या सूचना पाळून ग्रामस्थांनी वावरावे.


वनविभाग कायद्यावर बोट ठेवून सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवत आहे. पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले असून वन विभागाला माहिती दिल्यावरही वेळेत पंचनामे होत नाहीत. आता मनुष्यहानी झाल्यावर बिबटे जेरबंद करणार का? मानवाच्या जिवाशी खेळणाऱ्या वन विभागाच्या कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्यात येईल.
-पोपटराव गावडे, माजी आमदार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com