जेजुरीजवळील अपघातात दोन तरुण ठार

Mauli-&-Kiran
Mauli-&-Kiran

जेजुरी - आळंदी- पंढरपूर महामार्गावर जेजुरी शहराजवळ दोन कंटेनरमध्ये चिरडून दोन तरुण जागीच ठार झाले. हा अपघात आज (ता. ९) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात माउली बाळासाहेब धायगुडे आणि किरण लक्ष्मण फुलमाळी (दोघेही रा. नीरा, ता. पुरंदर) या दोघांचा मृत्यू झाला.

या अपघाताबाबत जेजुरी पोलिसांनी माहिती दिली, की नीरा येथील माउली धायगुडे आणि किरण फुलमाळी या दोघांचा छोटा व्यवसाय आहे.

व्यवसायाला लागणारा माल खरेदी करण्यासाठी ते जेजुरीला आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून (क्र. एमएच १२ एमएच ९४०४) येत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जुन्या जेजुरीजवळ महामार्गावर दोघांच्या पुढे चाललेल्या कंटेनरच्या (क्र. एमएच १२ केयू ०९६०) चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने ते कंटेनरच्या मागील बाजूस धडकले. त्याचवेळी त्यांच्या मागून वेगाने येणारा कंटेनर (क्र. एमएच १२ केपी ४५९९) त्यांना धडकला. या दोन्ही कंटेनरमध्ये चिरडल्याने दोघांच्या डोक्‍याला जबर मार लागला. डोके फुटल्याने दोघेही जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरचालकांना वाहनांसह ताब्यात घेतले आहे.

अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दुचाकीला मागून धडक देणारा कंटेनरचालक संतोष भगवान बराटे (वय ३०, रा. सुपे, ता. पाटोदा, जि. बीड) याच्यावर भरधाव वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेश मालेगावे करीत आहेत.
 
कंटेनरचालकांची स्पर्धा 
या अपघातावेळी दोन्ही कंटेनरचालक एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जणू त्यांची स्पर्धाच लावली होती. त्यामुळे दोघांना प्राणास मुकावे लागल्याची घटनास्थळी चर्चा होती. जेजुरी शहराजवळील भागात महामार्गाचा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्याने व वाहनांची संख्या जास्त असल्याने सतत अपघात घडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com