उरुळीतील दोन युवकांना अटक 

उरुळीतील दोन युवकांना अटक 

लोणी काळभोर - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पंधरावर्षीय शालेय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ पाच दिवसांनंतरही कायम असले, तरी संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन स्थानिक युवकांना मात्र लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. २४) दुपारी अटक केली आहे. प्रशांत निवृत्ती शेळके (वय २२) व प्रवीण विलास गाढवे (वय २३; दोघेही रा. उरुळी कांचन- बगाडेवस्ती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचारअंतर्गत (पास्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिली. 

उरुळी कांचन येथील एका पंधरावर्षीय शालेय विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये शनिवारी (ता. २०) पहाटे आढळून आला होता. तसेच, मृतदेहावर कसल्याही खुणा नसल्याने संबंधित मुलीचा खून की आत्महत्या, याबाबत नेमके सांगत येत नव्हते. त्यात संबंधित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत साशंकतेचे वातावरण निर्माण झाले होते. 

त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित मुलीचे नातेवाईक व संबंधित मुलगी राहात असलेल्या परिसरात लक्ष केंद्रित केले होते. यात प्रशांत शेळके व प्रवीण गाढवे या दोघांचे मागील काही महिन्यांपासून संबंधित मुलीबरोबर संबंध असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. त्याच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी (ता. २३) रात्री त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यात दोघांनीही संबंधित मुलीबरोबर शारीरिक संबंध असल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी ‘पास्को’अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच, शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित मुलीचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. 

दरम्यान, या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांना पंधरा हजार रुपयांचे इनाम पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com