पालिकेत जाऊनही उंड्रीकर तहानलेलेच

पालिकेत जाऊनही उंड्रीकर तहानलेलेच

उंड्री - शासनाला कराच्या रूपाने कोट्यवधींचे उत्पन्न देणारे उंड्री गाव सध्या पाणीटंचाईने प्रचंड त्रस्त आहे. पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल, अशी उंड्रीकरांची अपेक्षा होती; परंतु ती सपशेल फोल ठरली आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात कूपनलिकांचे, विहिरींचे पाणी आटल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टॅंकरचे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी नागरिक हडपसर, कोंढवा भागात धाव घेतात. सरकारी नळकोंढाळ्यावर पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे. त्यातही पाणी सुटण्याच्या निश्‍चित वेळा नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.   

मागील काही वर्षांत उंड्री परिसरात प्रचंड नागरीकरण झाले. उंड्रीची लोकसंख्या आजमितीला २५ हजारांच्या आसपास आहे. शाळा, मोठमोठे गृहप्रकल्प उभारले गेल्यामुळे या परिसराची पाण्याची गरज वाढली. या परिसरातील सोसायट्यांची संख्या ११७ असून, २५ लाख लिटर पाण्याची गरज आहे. सध्या महापालिकेकडून २ लाख लिटर पाणी मिळते. हे पाणी ग्रामपंचायतीच्या टाकीत सोडले जाते व जलवाहिन्यांद्वारे गावात पाणीपुरवठा केला जातो; परंतु तो अत्यल्प असून, त्याने पिण्याच्या पाण्याची गरज भागत नाही. त्यामुळे टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागते; परंतु यामुळे टॅंकरचा व्यवसाय तेजीत आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी समाविष्ट गावांपैकी फुरसुंगी, उरुळी देवाची गावांना भेटी देऊन तिथल्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक यांच्याशी चर्चा केली. तेथील समस्या सोडविण्याबाबत आश्वासन दिले; परंतु शेजारीच असणाऱ्या उंड्रीला भेट देण्याची साधी तसदीही त्यांनी घेतली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सोसायट्यांचे बजेट पाण्यामुळे कोलमडले 
विहिरीचे पाणी पुरवणाऱ्या टॅंकरचा दर ८००, तर पिण्याच्या पाण्याचा टॅंकर १५०० रुपये आहे. दररोज विकतचे पाणी घेतल्यामुळे जमा होणारा मेन्टेनस (सोसायटीचा निधी) पाणी विकत घेण्यासाठी पूर्ण खर्च होत आहे. अतूरनगरसारख्या मध्यमवर्गीयांची वसाहत असलेल्या सोसायट्यांना याचा फटका बसत आहे. हीच परिस्थिती व्यावसायिकांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com