उत्सव साधा करून शाळेला देणगी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

पिरंगुट - कोंढूर (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी अमृतेश्‍वराचा उत्सव अनाठायी खर्चाला फाटा देत साध्या पद्धतीने साजरा केला. वर्गणीतून उत्सवासाठी जमा झालेली तीन लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम ग्रामस्थांनीच सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयाला दिली. उत्सवातील झगमगाटापेक्षा भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कोंढूर ग्रामस्थांनी राबविलेल्या या उपक्रमातून गावची एकी आणि मुलांच्या प्रगतीची तळमळ दिसून आली.

मुठा खोऱ्यात डोंगराच्याकडेला कोंढूर गाव वसले असून, गावातील मुलांची माध्यमिक शिक्षणाबाबत खूप आबाळ होत होती. काही मुले मुठा येथे चालत जात होती. तसेच काही पुण्याला नातेवाइकांकडे राहून शिकत होती. परंतु मुली मात्र नाइलाजाने शिक्षणापासून वंचित राहत होत्या. त्यामुळे २१ वर्षांपूर्वी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन अमृतेश्वराच्या नावाने विनाअनुदानित माध्यमिक विद्यालय सुरू केले. सलग पंधरा वर्षे अमृतेश्वराचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करीत वर्गणीतून जमा झालेल्या रकमेतून ग्रामस्थांनी शाळेसाठी इमारत आणि इतर भौतिक सुविधा निर्माण केल्या. शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी आणि इतर भौतिक सुविधांसाठी खासदार सुप्रिया सुळे, तसेच पुण्यातील खुशबू चॅरिटेबल ट्रस्ट आर्थिक मदत करीत आहे. या पूर्वी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही शाळेला मदत केली होती. ग्रामस्थांनी गतवर्षी एक कोटी रुपये खर्चून अमृतेश्वराचे मंदिर नव्याने बांधले. मंदिराबरोबरच शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थ धडपडत असतात. त्यामुळेच महादेव कोंढरे यांनी उत्सवानिमित्त जमलेल्या बैठकीत साध्या पद्धतीने उत्सव करून जमा झालेली रक्कम शाळेच्या विकासासाठी देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी एकमुखाने होकार दिला. या बैठकीला पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच सारिका कुडले, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ कोंढरे, खजिनदार विठ्ठल हळंदे, पोलिस पाटील हनुमंत कोंढरे, माजी सरपंच शंकर मरगळे, शिवाजी ढेबे, बापू कोंढरे, उमेश धोत्रे आदी उपस्थित होते.

Web Title: uatsav school donation motivation