उबरने 10 गाड्यांसाठी रेल्वेला मोजले 71 लाख 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे - रेल्वे स्टेशनवर कॅब सेवा देण्यासाठी उबर कंपनीने बाजी मारली असून, एक वर्षासाठी तब्बल 71 लाख रुपये रेल्वे प्रशासनाला मोजले आहेत. त्यामुळे प्रवाशांना उबरची सेवा रेल्वे स्टेशनवर 24 तास मिळणार आहे. 

पुणे - रेल्वे स्टेशनवर कॅब सेवा देण्यासाठी उबर कंपनीने बाजी मारली असून, एक वर्षासाठी तब्बल 71 लाख रुपये रेल्वे प्रशासनाला मोजले आहेत. त्यामुळे प्रवाशांना उबरची सेवा रेल्वे स्टेशनवर 24 तास मिळणार आहे. 

रेल्वे स्टेशनवर कॅबच्या गाड्यांना जागा देण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने निविदा मागविल्या होत्या. त्यात उबरने बाजी मारली. त्यांच्या किमान 10 कॅब तेथे उपलब्ध राहणार आहेत. प्रवाशांनी प्रवासादरम्यान रेल्वेतून आरक्षण केलेल्या कॅब तेथे असतील; तसेच रेल्वेतून उतरल्यावर स्पॉट बुकिंगही त्यांना उबरच्या स्टॉलवर करता येणार आहे. यापूर्वी तीन महिन्यांसाठी ओला कंपनीला कंत्राट मिळाले होते. मध्य रेल्वेने उबरच्या गाड्यांसाठी 125 चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे स्टेशनच्या आवारात रिक्षांसाठी 400 चौरस मीटर जागा प्रशासनाने उपलब्ध करून दिली असून तेथे सुमारे 70 रिक्षा उभ्या राहतात. लोहमार्ग पोलिस, स्थानिक वाहतूक पोलिस यांच्याबरोबर बैठक घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशनवर दररोज सुमारे दोन लाख प्रवाशांची ये-जा होते. कॅबसेवेसाठी प्रवाशांची मागणी वाढत होती. त्याची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावरही विमानतळांच्या धर्तीवर अशाच प्रकारे कॅबसेवेसाठी जागा पुरविण्यात आली आहे. उबरला कंत्राट मिळाले असले तरी, सर्व प्रकारच्या वाहनांना ड्रॉप अँड पिक अपची सुविधा मोफत उपलब्ध आहे, असेही मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी सांगितले.

Web Title: Uber has counted 71 lakh trains for 10 trains