मदतीला धावणाऱ्यालाच मतदान करा - उदयनराजे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे - ""निवडणुकीच्या काळात आमिष दाखविणाऱ्या उमेदवाराला मत देण्यापेक्षा इतर वेळी मदतीला धावून येणाऱ्याचा विचार मतदारांनी करावा,'' अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे केले. 

पुणे - ""निवडणुकीच्या काळात आमिष दाखविणाऱ्या उमेदवाराला मत देण्यापेक्षा इतर वेळी मदतीला धावून येणाऱ्याचा विचार मतदारांनी करावा,'' अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे केले. 

पुणे जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मनीष आनंद यांच्या खडकी येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी भोसले बोलत होते. सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी या कार्यालयाचे सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, रवींद्र धंगेकर, संगीता तिवारी, वैशाली पहिलवान, अजित दरेकर आदी उपस्थित होते. कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो नसून, एक मित्र म्हणून येथे आलो, असे नमूद करीत उदयनराजे म्हणाले, ""कोणताही पक्ष माणसाला घडवीत नाही. जो नेता लोकांची जाणीव ठेवतो, तोच पक्ष वाढतो. निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवार दिले जातात. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी पक्ष आणि उमेदवार हे मतदारांना आमिष दाखवितात. संबंधित पक्षाचे नेते भाषणात तळागाळातील लोकांविषयीचे प्रेम व्यक्त करीत आश्‍वासने देतात. निवडून आल्यानंतर याच लोकांना गाळात घालतात. त्यामुळे मतदारांनी जो तुमच्या मदतीला येतो, त्याचा विचार केला पाहिजे.'' 

दोन खासदार, आठ आमदार आणि 98 नगरसेवक असलेल्या भाजपने पुणेकरांचा भ्रमनिरास केल्याची टीका बागवे यांनी केली. पूजा आनंद यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन बंडू चव्हाण यांनी केले. तिवारी यांनी आभार मानले. 

Web Title: Udayan Raje politics election