उदनराजे भोसले एंट्रीमुळे कोरेगाव मतदारसंघातील राजकारणाला धक्का

koregaon
koregaon

कोरेगाव - आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध बंड पुकारत उमेदवार बदलण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी विचार मंचद्वारे एकत्र आलेल्या राष्ट्रवादीतील नाराजांच्या एकसळ (ता. कोरेगाव) येथील बैठकीत खासदार उदनराजे भोसले यांनी एंट्री करुन कोरेगाव मतदारसंघातील राजकारणाला धक्का दिला आहे. ‘वाट्टेल त्या परिस्थितित दंडेलशाही चालू देणार नाही’, असे स्पष्ट करत ‘कोरेगाव म्हणजे काय चेष्टा वाटली काय?’ असा प्रश्‍न त्यांनी कोणाचेही नाव घेता उपस्थित केला. ‘तुम्ही तुमचे ठरवा, काय करायचे, काय नाही ते, आपण जो निर्णय घ्याल तो मला मान्य राहील व तुम्हाला संपूर्ण पाठिंबा राहील’, अशा शब्दांत त्यांनी या बैठकीतील उपस्थित नाराजांची पाठराखण केली. उदयनराजे यांनी त्यांच्या निधीतून गावात झालेल्या रस्त्याचे उदघाटनही यावेळी केले. 

आमदार शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या राष्ट्रवादीतील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी विचार मंचद्वारे एकत्र येऊन राजकीय भिशी सुरु केली आहे. एकसळ येथे काल रात्री झालेल्या या भिशीच्या मासिक बैठकीत खासदार भोसले यांची एंट्री झाली. प्रा. अनिल बोधे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर उदयनराजे म्हणाले, ‘‘प्रश्‍न राजकारणाचा कधीच नव्हता व कधीच नसणार. गेली २०-२५ वर्षे कशी गेली मला माहित नाही. पण आपण सर्वांनी माझ्यावर प्रेम केले. तुमच्या विश्‍वासाला तडा जाऊ दिला नाही व देणारही नाही. प्रेम, नाते जुळले पाहिजे. ते मागून, पुस्तकात वाचून मिळत नाही. कोरेगावकर एकत्र येत नाहीत, याची खंत वाटते. एेनवेळेस कोणाचा बैल इकडे, कोणाची गाय तिकडे, तर कोणाची म्हैस कोठे, अशी परिस्थिती असते. पण विश्‍वासाला तडा गेला, की लोकं पाठ फिरवतात.’’ प्रत्येक ठिकाणी ‘मी-मी’ कशाला? असा प्रश्‍न उपस्थित करुन ‘जेव्हा काम काढायची वेळ येईल, तेव्हा कामच काढणार’, असे इशारेवजा वक्तव्यही खासदार भोसले यांनी यावेळी केले. सुनिल खत्री म्हणाले, ‘‘उदयनराजे यांनी आमचे मनोबल वाढवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगावातील उमेदवार बदलण्याची मागणी लावून धरु.’’ ॲड. पांडुरंग भोसले यांनी स्वागत केले. लक्ष्मण भिलारे, अजय कदम, हिंदूराव भोसले यांची भाषणे झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com