ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास अच्छे दिन - संजय राऊत

Sanjay-Raut
Sanjay-Raut

नारायणगाव - भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मुस्लिम महिलांच्या ट्रिपल तलाकची चिंता आहे. मात्र महिलांना पळवून नेण्याची भाषा वापरणाऱ्या आमदार राम कदम यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री गप्प आहेत. मुख्यमंत्री कोणाला सोबत घेऊन राज्यकारभार करत आहेत.

शिवसेनेच्या आमदारांनी महिलांचा अवमान केला असता, तर शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली शिक्षा केली असती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास राज्याला खऱ्या अर्थाने अच्छे दिन येतील, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. 

नारायणगाव (ता. जुन्नर) येथे पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना नेते राऊत यांनी येथील जयहिंद मंगल कार्यालयात जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. 

या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख राम गावडे, तात्यासाहेब गुंजाळ, निवृत्ती काळे, अशोक गांधी, तालुका अध्यक्ष माउली खंडागळे, गटनेत्या आशा बुचके, अरुण गिरे, अविनाश राहणे, उपतालुका प्रमुख संतोष खैरे, सरपंच योगेश पाटे, उपसरपंच संतोष दांगट उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले, ‘‘राणी लक्ष्मीबाई, अहल्याबाई होळकर यांची प्रेरणा असलेल्या राज्यात भाजपचा आमदार महिलांना पळवून नेण्याची भाषा वापरतो. या पूर्वी आमदार परिचारक यांनी सैनिकांबाबत तर दानवे यांनी शेतकऱ्यांबाबात अवमानकारक वक्तव्य केले होते.’’ शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना राऊत म्हणाले हाजी अराफत शेख ही गटारगंगा आहे. त्यांनी अनेक पक्ष बदलले आहेत.

जुन्नरचा उमेदवार निश्‍चित - राऊत
जुन्नरला शिवसेना उमेदवार आयात करणार का, या प्रश्‍नाला बगल देताना खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांवर शिवसेनेचा भगवा निश्‍चित फडकणार आहे. जुन्नरमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना जो गोंधळ झाला, ती चूक आता होणार नाही. एकदा जाहीर केलेला उमेदवार पुन्हा बदलणार नाही. पक्षप्रमुखांनी जुन्नरचा उमेदवार निश्‍चित केला आहे.’’

पक्षप्रमुखांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे लवकरच या भागाचा दौरा करतील. आगामी निवडणुकीत राज्यात शिवसेनेचा भगवा फडकणार असून, राज्याच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान होतील.
- संजय राऊत, शिवसेना खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com