PM, CM यांच्या तोंडाला बूच लावा - उद्धव ठाकरे

PM, CM यांच्या तोंडाला बूच लावा - उद्धव ठाकरे

पुणे - "सामना' बंद ठेवण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. मग ही आणीबाणी नाही का? इंदिरा गांधीवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. यावरून त्यांना छुपी आणीबाणी आणायची आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या तोंडाला आधी बूच लावा, अशी विखारी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

"परिवर्तन तर होणारच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी आयुष्य वाहून भारतीय जनता पक्ष उभा केला. ते जाऊन आता भाजपत गुंडांचे राज्य येणार आहे,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बुधवारी तोफ डागली. "शब्द देतो म्हणाऱ्यांनी आतापर्यंत दिलेले किती शब्द पाळले. विश्‍वास ठेवू नका, आम्ही फसलो, तुम्ही फसू नका,' असे आवाहन त्यांनी पुणेकर मतदारांना केले. 

महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. तासभराच्या भाषणात ठाकरे यांनी भाजपने गुंडांना दिलेला प्रवेश, युती तुटण्यामागचे कारण, भाजप-राष्ट्रवादीची छुपी युती यावर भाष्य केले. ते म्हणाले, ""जागावाटपावरून युती तर तुटली. गेली पंचवीस वर्षे निष्ठेने आम्ही त्यांच्याबरोबरच राहिलो. प्रत्येक संकटात खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिलो. त्यांची अनेक वर्षे ओझी आम्ही वाहिली. मात्र केंद्रात सत्ता आल्यानंतर त्यांच्या वर्तनात परिवर्तन झाले. गुंडा-पुंडांना बरोबर घेऊन भाजप पुढे जाणार असेल, ते आम्हाला मान्य नाही, म्हणून युती तोडली. या पुढे काही झाले, तरी त्यांच्याबरोबरच युती नाही. मुख्यमंत्री माझे चांगले मित्र आहेत. परंतु जो मित्र राज्याची, राजधानीचा अवलेहना करीत असेल, तर मैत्री गेली खड्ड्यात. माझी बांधली ही जनतेशी आहे.'' 

नोटांबदी, शेतकऱ्याची कर्जमाफी पासून मुंबईत अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, अयोध्येतील राममंदिर यांचा उल्लेख करून ते कधी पूर्ण करणार, असा सवालही त्यांनी भाजपला केला. 

दोन्ही कॉंग्रेसबरोबर शिवसेनेचे सेटिंग आहे, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, ""शिवसेनेत सेटिंग लावणारे सैनिक नाहीत. सैनिक सेटिंग करून कधीही लढाईला जात नाहीत. शिवसेना कधीही फ्रेंडली मॅच खेळत नाही. सोबत असाल, तर मित्र आणि समोर असला, तर दुश्‍मन. मुख्यमंत्री म्हणतात, टीका कशाला करता, मग तसे वागू नका. भूक असेल, तेवढेच खा. परंतु त्यांना खा खा सुटली आहे. आम्ही व्यक्तीवर नाही, तर त्यांच्या वृत्तीवर टीका करतो. तुम्ही जे करता ते जर राज्याच्या आणि देशाच्या मुळावर येणार असेल, तर टीका करणारच. तो माझा अधिकार आहे. शिवसेनेने टेकू दिल्यामुळे तुमची खुर्ची टिकली आहे.'' 

पुण्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, ""पुणेकरांनी त्यांना भरभरून दिले. एक खासदार आणि आठ आमदार दिले. परंतु त्यांनी पुणेकरांना काय दिले? आजपर्यंत तुम्ही कॉंग्रेसचा कारभार पाहिला, राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार पाहिला आणि भाजपचे परिवर्तनही पाहिले. आता शिवसेनेला एक संधी द्या. कधी तरी महापालिकेवर भगवा फडकवू द्या. मुंबईसारखा पुण्याचाही आम्ही विकास करू.'' 

या वेळी संपर्कप्रमुख अमोल कोल्हे, शहरप्रमुख विनायक निम्हण, राज्यमंत्री विजय शिवतारे, शशिकांत सुतार, आमदार नीलम गोऱ्हे, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, रमेश बोडके आदी उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांना या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. तसे पत्र पक्षाचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी ठाकरे यांना दिले. 

हीच खरी पारदर्शकता 
भाजपच्या पारदर्शकतेच्या मुद्‌द्‌याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, ""पारदर्शक कारभारासाठी सिंहगडावर शपथ घेतली ती फक्त महापालिकेसाठी. तशी राज्याच्या पारदर्शक कारभारासाठी सुद्धा शपथ घ्या. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराची सर्व माहिती जाहीर करा. कोणी किती भूखंड, चिक्की आणि डाळ खाल्ली हे जनतेला कळू द्या. तर त्याला पारदर्शक कारभार म्हणता येईल. पारदर्शकतेची शपथ घेतल्यामुळेच बापट यांनी या मुख्यमंत्र्यांच्या काळात 65 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वक्तव्य केले, हीच खरी पारदर्शकता आहे.'' 

गिरीश बापट यांच्यावर टीका 

शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका केली. ""बापट हे फिल्म बघण्यात फार बिझी असतात. त्यामुळे त्यांना फोन करण्याचा प्रश्‍नच पडत नाही,'' असे म्हणतच सभेत हशा उसळला. त्यावर ठाकरे म्हणाले, ""तुम्ही असा-तसा काही विचार करू नका, त्यांच्याकडे संत-महात्मांच्या फिल्मदेखील असतील. '' तर विजय शिवतारे म्हणाले, ""पुण्याचा पालकमंत्री कारभारी बदला. तो काहीच कामाचा नाही.'' 

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या 
माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मुदतपूर्व निवडणुकांचे सूतोवाच केले होते. त्यावर "इतरांना फार घाई झाली आहे. थोडे थांबा', असे सांगून ठाकरे म्हणाले, ""महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. तहहयात आमचा तुम्हाला पाठिंबा राहील.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com