'युती'वरून उद्धव ठाकरेंचा 'यू-टर्न'..?

357661394.jpg
357661394.jpg

पुणे : मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेऊन आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची "राणाभीम थाटात' घोषणा करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आता युतीबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. पुढील निवडणुका आम्ही एकत्र लढू की नाही हे माहिती नाही. हा निर्णय पक्षातील अनेकजणांचा असेल, असे सांगत, उध्दव यांनी शनिवारी पुण्यात युतीचे संकेत दिले. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, भाजपशी जुळवून घेण्याची भाषा करतानाच उध्दव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीकाही केली. 

दिल्ली आणि मुंबईत सत्ता स्थापन करताना शिवसेनेन भाजपला साथ दिली खरी; मात्र, तेव्हापासूनच शिवसेना सातत्याने भाजपविरोधात भूमिका घेऊन आक्रमक राहिली. राज्यात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढली. या दरम्यान दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर तुटून पडले. विशेषत: पालघरच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने टोक गाठले. तेव्हाच, आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेनेने ठामपणे जाहीर केले. त्यामुळे पुढील सर्व निवडणुका शिवसेना एकटी लढणार असल्याचे मानले जात होते. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे भाजपने नमती भूमिका घेत, उध्दव यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उध्दव यांची भेट घेऊन त्यांची समजूतही काढण्याचा प्रयत्न केला. तरीही उध्दव आपल्या निर्णयावर ठाम राहिले. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी उध्दव पुण्यात आले होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील पक्षाची कामगिरी, मतदारसंघांमधील ताकद आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी केल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उध्दव यांनी युती तोडण्याच्या निर्णयापासून एक पाऊल मागे आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ते म्हणाले, ""सत्तेत असूनही आम्ही भाजपशी भांडत राहिलो. ते जनतेसाठी. सरकारच्या धोरणांमुळे आक्रमक व्हावे. पुढील निवडणुकांमध्ये एकत्र असू की नाही हे माहित नाही. त्याबाबतचा निर्णय कोण एकटा घेत नाहीत. तो अनेकजण एकत्र येऊन घेतात. परंतु, ज्या अपेक्षेने लोकांनी निवडून दिले, त्या प्रमाणात भाजप सरकारने कामे केली नाहीत. त्यामुळे लोकांचा अपेक्षा भंग झाला आहे. '' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com