उद्योगनगरीत विक्रमी मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

तरुणांची संख्या लक्षणीय, मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग, मतदारांचा गोंधळ

तरुणांची संख्या लक्षणीय, मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग, मतदारांचा गोंधळ

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या ३२ प्रभागांत मंगळवारी (ता. २१) सकाळी साडेसात वाजता एक हजार ६०८ मतदान केंद्रांवर शांततेत व उत्साहात प्रारंभ झाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत ६५ ते ६८ टक्के मतदान झाले. प्रभाग ६ (क) मध्ये भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाल्याने १२७ जागांसाठी ७७३ उमेदवारांचे भवितव्य इव्हिएम मशिनमध्ये बंद झाले. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांचा लक्षणीय सहभाग होता. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस हे पक्ष निवडणुकीत असले तरी बहुतांश भागात तिरंगी लढत असल्याचे चित्र होते. मतदानाला सुरवात झाली तेव्हा काही ठिकाणी थंड प्रतिसाद मिळाला. मात्र, अकरानंतर मतदानाचा जोर वाढत गेला. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.

पहिल्या दोन तासांत सरासरी सात ते दहा टक्के मतदान झाले. सकाळ साडेअकरापर्यंत सरासरी २०.७३ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी दीडपर्यंत ३०.८६ टक्के, तर दुपारी साडेतीनपर्यंत ४३.८० टक्के मतदान झाले. पिंपळे सौदागर भागात सर्वांत जास्त म्हणजे ४५ ते ५० टक्के मतदान दुपारी दोन वाजेपर्यंत झाले होते; तर मोहननगर येथील दोन्ही मतदान केंद्रांवर अल्प म्हणजे २१ टक्के मतदानाची नोंद झाली. याभागात श्रमिक वर्ग अधिक असल्याने दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.

‘मनी, मसल व पॉवर’चा सर्रास वापर
मतदार यादीत नाव नसल्याच्या अनेक तक्रारी मतदान केंद्रावर पाहावयास मिळाल्या. इच्छा असूनही अनेकांना मतदान करता आले नाही. अनेक ठिकाणी बोगस मतदान केल्याच्या घटना घडल्या. या निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ‘मनी, मसल व पॉवर’चाही वापर दिसून आला. अनेक ठिकाणी उमेदवारांनी मतासाठी एक हजार ते आठ हजार रुपये मोजल्याचे प्रकार आढळून आले. यमुनानगर येथे शिवसेनेच्या उमेदवारासाठी एका कार्यकर्त्याला पैसे वाटत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. प्राधिकरण प्रभाग १५ मध्ये मतदानासाठी दुपारी रांगा लागल्याचे चित्र होते. निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, दापोडी, नवी सांगवी, वाकड, थेरगाव, किवळे, चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी इत्यादी भागांत मतदान उत्साहात पार पडले. निवडणूक निरीक्षक अपूर्व चंद्रा यांनी दुपारी पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्राला भेट दिली. आजच्या मतदानासाठी आठ हजार ९२५ कर्मचारी व १७८७ पोलिस कर्मचारी नियुक्त केले होते, तर बंदोबस्तासाठी राज्य राखीव दल, होमगार्ड व पोलिस असे अडीच हजार कर्मचारी तैनात होते.

जाधववाडीत उमेदवारास मारहाण
काही ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांत बाचाबाचीचे प्रकार घडले. कासारवाडीतील मतदान केंद्राजवळ एका उमेदवाराकडून मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. जाधववाडीत शिवसेना उमेदवार अंकुश जाधव यांना विरोधी गटाकडून धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी मतदान केंद्राबाहेर जादा पोलिस कुमक तैनात करण्यात आली. काळेवाडी भागात मतदाराच्या स्लिपांवर पक्षाचे चिन्ह आढळून आल्याने संबंधित मतदार व उमेदवारावर पोलिसांनी कारवाई केली. 

ईव्हीएम मशिन नादुरुस्त
भाटनगर येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास ईव्हीएम मशिन बंद पडल्याने सुमारे पंधरा मिनिटे मतदान प्रक्रिया बंद पडली होती. तसेच पिंपरी गावातील मतदान केंद्र क्रमांक ६२, प्राधिकरण, भोसरी, संत तुकारामनगर आदी ठिकाणी ईव्हीएम मशिन नादुरुस्त झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा आला. वाकड येथील एका मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे माहिती फलक दिसत होते. आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसवून येथे उमेदवारांनी आपले फलक लावलेले आढळले. 

क्षणचित्रे
मोठ्याप्रमाणात क्रॉस व्होटिंग
आयटीयन्स मतदारांमध्ये उत्साह 
पिंपळे सौदागर भागात दुपारी दोनपर्यंत ५० टक्के मतदान
उपनगरीय भागात मतदारांत उत्साह
भोसरी गावठाणामध्ये गोंधळ 
मतदान कसे करायचे, हे समजून घेताना मतदानाला विलंब 
रुपीनगर येथील मतदान केंद्रावर पंचवीस अपंग मतदारांचे मतदान 
पिंपरीत मतदारांच्या स्वागतासाठी लाल पायघड्या

थापाड्या अधिकारी
दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास प्रभाग १९ मध्ये भाटनगर येथील (कै.) नवनाथ दगडू साबळे प्राथमिक शाळेतील मतदान यंत्र बंद पडले. त्याबाबत माहिती मिळताच एक अधिकारी १५ मिनिटांत तिथे आले. त्यांनी बंद यंत्र उलटे केले आणि त्यावर मागून एक थाप मारली. त्यामुळे बंद यंत्र लगेच सुरू झाले; मात्र त्या वेळी तिथे आलेल्या पत्रकारांना ते बंद पडलेच नव्हते, अशी थाप त्या अधिकाऱ्याने मारली. 

पोलिस बनले चोरावर मोर
पिंपरीगावात (प्रभाग क्रमांक २१) एका उमेदवाराच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंपरी पोलिस घटनास्थळी येताच पैसे वाटप बंद झाले; मात्र तरीही ते घेण्यासाठी अनेक जण तिथेच घुटमळत होते. बराच वेळ होऊनही पोलिस तेथून जात नसल्यामुळे दोन कार्यकर्ते पोलिसांजवळ आले. त्यांनी पाठीमागच्या मतदान केंद्रावर गडबड झाल्याचे सांगितले. ‘‘हो का? पण आमचे अधिकारी आहेत तेथे, आम्ही येथेच थांबतो,’’ असे म्हणत पोलिसांनी कार्यकर्त्यांचा हा डाव हाणून पाडला.

निवडणूक विभागाचा गोंधळ
चिंचवडगाव क्रमांक १८ मधील काही मतदारांना मतदानाच्या स्लीप घरी आल्या होत्या; मात्र ते मतदानासाठी गेले असता तेथे मतदार यादीत नावच नसल्याचे दिसून आले. तेथील एका इमारतीमधील काही मतदारांची नावे जवळच्या बूथमध्ये, तर काहींची नावे लांबच्या मतदार केंद्रामध्ये असल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाला होता. दोनऐवजी चार सदस्यीय प्रभाग झाल्याने कराव्या लागलेल्या मतदारांच्या या विचित्र फोडाफोडीमुळे मतदारांना मोठा मनस्ताप झाला. त्यामुळे या वेळी सत्तर टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवलेल्या निवडणूक आयोगाला त्यांच्या या सावळ्यागोंधळ कारभाराचाच फटका बसला. 

ते काम आमचे नाही
तानाजीनगर भागात शिवाजी उदय मंडळ येथे मतदानाचा बूथ होता. त्यासमोरच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधीतून काम केल्याचा मोठा फलक होता. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, मतदान आणि बूथ येथील कामाची जबाबदारी आहे. रस्त्यावर कोणता फलक आहे, हे पाहणे निवडणूक विभागाचे काम नसल्याचे उत्तर दिले.

Web Title: Udyoganagarita voting record