'उजनी'त पडणार एक टीएमसी पाण्याची भर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

पुणे - पुणे जिल्ह्यात तसेच धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचे पाणी नद्यांतून उजनी धरणाकडे वाहू लागले असून, उजनीच्या पाणीसाठ्यात मंगळवारी एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची भर पडण्याचा अंदाज आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात तसेच धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचे पाणी नद्यांतून उजनी धरणाकडे वाहू लागले असून, उजनीच्या पाणीसाठ्यात मंगळवारी एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची भर पडण्याचा अंदाज आहे.

भीमा आणि कृष्णा खोऱ्यांतील प्रमुख 37 धरणांतील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत 11.42 टीएमसीने वाढ झाली. भीमा खोऱ्यातील प्रमुख 25 धरणांतील साठा आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांत 6.97 टीएमसीने वाढला. या धरणांतील एकूण पाणीसाठा 20.26 टीएमसी (9.41 टक्के) झाला आहे. कृष्णा खोऱ्यातील अकराही धरणांच्या क्षेत्रात दमदार पाऊस पडत असून, या धरणांत एकूण 30.02 टीएमसी (14.30 टक्के) पाणीसाठा आहे.

दौंड परिसरातील नदीपात्र कोरडे होते. त्यामुळे, नदीपात्रातून येणारे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण जास्त होते. मुळा-मुठा, इंद्रायणी, भीमा या नद्यांतून वाहणारे पाणी उजनी जलाशयात पोचू लागले आहे. दौंड येथे भीमा नदीतून सायंकाळी चार वाजता 13233 घनफूट प्रति सेकंद (क्‍युसेक), तर रात्री आठ वाजता 30347 क्‍युसेक वेगाने पाणी वाहत होते. उजनीमध्ये (उणे) 28.63 टीएमसी साठा आहे. तेवढे पाणी जमा झाल्यानंतर उजनीत उपयुक्त पाणीसाठा जमा होण्यास सुरवात होईल.

मुठा खोऱ्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 4.39 टीएमसी; तर नीरा खोऱ्यातील चारही धरणांत 6.15 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही काल चांगला पाऊस झाला असून, त्या धरणांत एकूण 0.63 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी निम्मा साठा गेल्या 24 तासांत जमा झाला. कोयना धरणाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासांत 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात 12.52 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Web Title: 'ujani' around a 1TMC water