उजनी धरणग्रस्तांचा जलबुडीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

इंदापूर - उजनी धरणग्रस्तांचे ४० वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न सरकारने न सोडविल्यास २६ जानेवारी रोजी धरणासाठी त्याग केलेले भूमिपुत्र गावागावात जलबुडी आंदोलन करतील, असा इशारा धरणग्रस्तांचे नेते तुकाराम सरडे, उजनी धरण बचाव संघर्ष समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांनी दिला. 

इंदापूर - उजनी धरणग्रस्तांचे ४० वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न सरकारने न सोडविल्यास २६ जानेवारी रोजी धरणासाठी त्याग केलेले भूमिपुत्र गावागावात जलबुडी आंदोलन करतील, असा इशारा धरणग्रस्तांचे नेते तुकाराम सरडे, उजनी धरण बचाव संघर्ष समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांनी दिला. 

विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या पुढाकाराने जलबुडी आंदोलनाचे आयोजन भीमानगर (ता. माढा) येथे करण्यात आले होते. या वेळी काही शेतकऱ्यांनी धरणाच्या पाण्यात उभे राहून सरकारचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी तातडीने स्थानिक आंदोलकांना पाण्याबाहेर काढून कडक बंदोबस्त ठेवला. या वेळी कार्यकारी अभियंता गवळी यांना निवेदन देण्यात आले. धरणग्रस्तांचे जिल्हा प्रशासनांतर्गत असलेले सर्व प्रश्‍न सोडविण्याचे लेखी आश्‍वासन जिल्हा पुनर्वसन अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी या वेळी दिले. 

या वेळी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब आरकिले, सचिव संताजी दिघे, चंद्रकांत देशमुख, इंदापूर समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप, कार्याध्यक्ष अंकुश पाडुळे, सातारा जिल्हाध्यक्ष देवराज देशमुख, करमाळा बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, माढा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश पाटील उपस्थित होते.

...या आहेत प्रमुख मागण्या
 उजनी धरण पाणीप्रश्‍न, गाळपेर जमीन, मच्छीमारी या अडचणी सोडवा
 पुणे, सोलापूर, सातारा तसेच नगर जिल्ह्यातील धरणग्रस्तांना तातडीने पर्यायी जमिनीचे वाटप करावे
 धरणग्रस्तांच्या गावठाणात नागरी सुविधांची कामे करून पुनर्वसित गावठाणांना ग्रामपंचायत दर्जा द्यावा
 भूमिहीन शेतकऱ्यांच्या मिळालेल्या जमिनीवरील नवीन शर्त शेरा कमी करण्यासाठी पन्नास टक्के रकमेची अट रद्द करावी
 धरणग्रस्त गावठाण वस्तीमधील विविध सुखसुविधांची व मूलभूत कामांना तातडीने निधी द्यावा
 धरणग्रस्तांच्या अडचणी संदर्भात महिन्याला जिल्हास्तरावर बैठक घ्यावी

धरणग्रस्त संघटनेने ६ डिसेंबर रोजी पुणे विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना धरणग्रस्तांच्या प्रश्‍नाबाबत तातडीने बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे. मात्र धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी उजनी धरण लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करून कालमर्यादा निश्‍चित करून प्रश्न सोडवावेत.
- सुरेश जकाते, धरणग्रस्त

Web Title: Ujani Dam affected Warning