पुण्यात अतिनील किरणे धोकादायक पातळीवर 

योगिराज प्रभुणे 
सोमवार, 14 मे 2018

दुपारी १२ ते ३ या वेळेत अतिनील किरणांचे सर्वाधिक उत्सर्जन होते. यंदाच्या उन्हाळ्यातील गेल्या २१ दिवसांमध्ये पाषाणमध्ये सर्वाधिक दिवस अतिनील किरणे धोकादायक पातळीवर होती. त्यामुळे नागरिकांनी अतिनील किरणांपासून स्वतःचे संरक्षण करावे. त्यासाठी योग्य काळजी घ्यावी.
-गुफरान बेग, प्रकल्प संचालक, सफर

पुणे - पुणेकरांनो, तुम्ही दुपारी १२ ते ३ या दरम्यान शक्‍यतो घराच्या किंवा कार्यालयाच्या बाहेर पडू नका. कारण उन्हाळ्यामुळे अतिनील किरणांचे शहरातील प्रमाण धोकादायक पातळीवर आहे. या किरणांमुळे त्वचा भाजून तर निघत आहेच, पण त्यातून त्वचेचे विकार आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोकाही असतो. पाषाणमध्ये गेल्या २१ पैकी १४ दिवस अतिनील किरणांचे प्रमाण धोकादायक पातळीवर होते. 

शहरात गेले काही दिवस सातत्याने कमाल तापमानाचा पारा चाळिशीपेक्षा जास्त नोंदविला जात आहे. त्यामुळे २० एप्रिल ते १० मे या २१ दिवसांमधील अतिनील किरणांचे विश्‍लेषण पुण्यातील ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थे’च्या (आयआयटीएम) ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च’तर्फे (सफर) करण्यात आले. त्यासाठी पुण्यातील लोहगाव आणि पाषाण येथील अतिनील किरणांचे प्रमाण मोजण्यात आले. त्याच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे, अशी माहिती  प्रकल्प अधिकारी नेहा पारखी यांनी दिली. 

काही अंशी सूर्यप्रकाश हा आपल्या आरोग्यासाठी निश्‍चित चांगला असतो. त्यातून आपल्या शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ मिळते. पण मोठ्या प्रमाणात उन्हात काम करणे आणि तेही भर दुपारच्या वेळेला हे आपल्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सूर्योदयानंतर अतिनील किरणांचे निर्देशांक वाढत जातो. दुपारी दोन वाजता तो सर्वांत अधिक असतो. दुपारी तीननंतर तो कमी होत जातो. रात्रीच्या वेळी अतिनील किरणांचा निर्देशांक  शून्य असतो. 

दुपारी १२ ते ३ या वेळेत अतिनील किरणांचे सर्वाधिक उत्सर्जन होते. यंदाच्या उन्हाळ्यातील गेल्या २१ दिवसांमध्ये पाषाणमध्ये सर्वाधिक दिवस अतिनील किरणे धोकादायक पातळीवर होती. त्यामुळे नागरिकांनी अतिनील किरणांपासून स्वतःचे संरक्षण करावे. त्यासाठी योग्य काळजी घ्यावी.
-गुफरान बेग, प्रकल्प संचालक, सफर

Web Title: Ultraviolet radiation in Pune at a dangerous level